पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोकणात फिरायला जाण्यासाठी आईने पैसे न दिल्याच्या कारणावरून मुलाने आईच्या डोक्यात कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार 12 जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला.
ईश्वर प्रकाश गलांडे (38, रा. नवरत्न सोसायटी, वडगांवशेरी) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत नंदा प्रकाश गलांडे (66, रा. नवरत्न सोसायटी, वडगांवशेरी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर याला कोकणात फिरायला जायचे होते. त्याने या साठी त्याची आई नंदा यांना पैसे मागीतले. परंतू नंदा यांनी पैसे देण्यास नकार दिला. याचा ईश्वर याला राग आला. त्याने रागाच्या भरात आई नंदा यांना शिविगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच त्यांना लाथा बुक्कांनी मारहाण केली. नंदा यांनी त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयतत्न केला. मात्र, ईश्वरने घरातील कोयत्याने त्यांच्या डोक्यावर वार केले. यानंतर आरोपी हा तेथून फरार झाला.
नंदा या घटनेत गंभीर जखमी झाल्या. नातेवाईकांनी त्यांना दवाखान्यात नेले. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यानंतर त्यांनी येरवडा पोलिस ठाणे गाठत मुलाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी याची दखल घेत आरोपी मुलगा ईश्वर याला अटक केली आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक समीर करपे करत आहे.