राहुरी; पुढारी वृत्तसेवा : 1.85 लाख रुपये घेऊन लग्न लावून दिले, मात्र लग्नानंतर सासरी आलेली नवरी अवघ्या तिसर्याच रात्री नातेवाईकांसह गायब झाल्याचा अजब प्रकार तालुक्यातील तमनर आखाडा येथे घडला. फसवणूक झालेला तरुण म. फुले विद्यापीठमध्ये कंत्राटी सुरक्षा रक्षक आहे. अशोक भाऊसाहेब खेमनर (वय 28 वर्षे) हा तरुण तमनर आखाडा येथे राहतो. अशोक याच्या लग्नासाठी एका नातेवाईकाने मुलगी पाहिली. '2 लाख रुपये घेऊन या,' असे अशोकला सांगण्यात आले. आई, वडिलांसह अशोक पारनेर येथे गेला असता, मुलगी हिंगोलीमध्ये असल्याचे सांगितले.
अशोक (दि. 3 जुलै 2022) रोजी आई, वडील व नातेवाईकांसह अनिता रामचंद्र अग्रवाल (रा. बाळापूर आखाडा, जि. हिंगोली) यांच्या घरी गेला. मुलगा – मुलीची पसंती झाली, 'मात्र 2 लाख रुपये दिले तरचं लग्न होईल,' अशी अट मुलीच्या नातेवाईकांनी घातली. दरम्यान, अशोकने संबंधिताना 1. 85 लाख रुपये दिले होते. यानंतर (दि 5 जुलै) रोजी अशोक चे लग्न सोनी शंकर पाटील (रा. आनंदनगर, अमरावती) या तरुणीशी लावले.
अशोक नवरीला घेऊन घरी तमनर आखाडा येथे आला. (दि. 8 जुलै) रोजी पत्नी सोनी हिचे नातेवाईक आले. ते अशोकच्या घरी मुक्कामी थांबले. रात्री जेवनानंतर सर्व झोपले. (दि.9 जुलै) रोजी रात्री 1 वाजेच्या दरम्यान पत्नीसह नातेवाईक गायब झाल्याचे त्याच्या लक्षात आले. पोलिसांनी चंदू सीताराम थोरात (रा. ढवळपुरी), भाऊसाहेब वाळुंज (रा. टाकळी ढोकेश्वर), शाम वाबळे, रा. वासुंदे, ता. पारनेर), अनिता रामचंद्र अग्रवाल (रा. बाळापूर आखाडा, जि. हिंगोली), सुनील शरद कांबळे (रा. शिवाजीनगर, उस्मानाबाद) राहुल पाटील, सोनी शंकर पाटील (रा. आनंदनगर, अमरावती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
'ती' परतलीच नाही..!
अशोकने मध्यस्थी लोकांकडे चौकशी केली असता, 'नव विवाहिता नातेवाईकांसोबत माहेरी गेली. आम्ही दोन- तीन दिवसांमध्ये तिला तुमच्या घरी घेवून येऊ,' असे सांगितले, मात्र अशोकची पत्नी परतलीच नाही.