तापमान वाढ  
Latest

चिंता वाढवणारा इशारा

backup backup

पृथ्वीवरील वाढते तापमान कमी करण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न केले नाहीत, तर येत्या आठ दशकांनंतर हिमालयातील 80 टक्के हिमनद्या वितळलेल्या दिसतील, असे 'इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माऊंटन डेव्हलपमेंट'च्या अहवालातून समोर आले आहे. हा अहवाल भावी पिढ्यांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करणारा असून, त्यातून सुधारण्याबाबत एकप्रकारे इशाराच देण्यात आला आहे.

या अहवालासाठी करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, हरितगृह वायूंचे उत्सर्जन असेच वाढत राहिल्यास 2100 सालापर्यंत हिंदकुश पर्वतातील 88 टक्के हिमनद्या नष्ट होतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. जगातील ध—ुवीय प्रदेशांव्यतिरिक्त बहुतेक बर्फ या भागात जमा असून, तो साठण्यास हजारो वर्षे लागली आहेत. चालू शतकाच्या पहिल्या दशकाच्या तुलनेत दुसर्‍या दशकात हिमनद्या 65 टक्के अधिक वेगाने वितळल्या गेल्याचे अभ्यासाचे निष्कर्ष धक्कादायक आहेत.

'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे होणार्‍या नुकसानीबाबत या अहवालात विस्ताराने भाष्य करण्यात आले आहे. त्यानुसार 2100 सालापर्यंत हिमनद्या याच वेगाने वितळत राहिल्यास या भागातील दोन अब्ज लोकांच्या रोजगारावर आणि जीवनावर परिणाम होईल. तसेच यामुळे आपली सिंचन व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाईल. याखेरीज पशुधनाचेही मोठे नुकसान होईल. हिमालयीन प्रदेशातील हिमनद्या आणि बर्फाच्छादित पर्वत रांगांमधून त्या प्रदेशातील बारा नद्यांपर्यंत वाहणारे जीवनदायी पाणी सुमारे 24 कोटी लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. या हिमनद्या झपाट्याने वितळल्या, तर भीषण पूर आणि हिमस्खलनामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होईल. दोन वर्षांपूर्वी उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात झालेला विध्वंस जगाने पाहिला. भविष्यात अशा संकटांसाठी तयार राहावे लागेल, हे या अहवालाचे सार आहे.

हिंदकुश पर्वत रांगेतील वितळणार्‍या हिमनद्यांचा अभ्यास करणार्‍या 'इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माऊंटन डेव्हलपमेंट' या संस्थेत भारत, चीन, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान आणि म्यानमारचे सदस्य सहभागी आहेत. जागतिक तापमान वाढ 2 अंश सेल्सिअसच्या खाली राहिल्यास 2100 सालापर्यंत प्रदेशातील हिमनद्या 30 ते 50 टक्क्यांनी वितळतील, असा इशारा या अभ्यासात देण्यात आला आहे. परंतु, जर तापमान दोन अंशांपेक्षा जास्त राहिले, तर त्यांचा वितळण्याचा दर 55 ते 80 टक्के असू शकतो. येऊ घातलेले संकट पाहता जगातील विकसित आणि विकसनशील देशांना धोक्याची घंटा मानून युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागतील; अन्यथा कोट्यवधी लोकांचे जीवन धोक्यात येईल.

यामुळे या देशांची अन्नसुरक्षा नष्ट होईल आणि तेथे नैसर्गिक आपत्ती अनेक रूपात कहर करेल.
2021 मध्ये चमोली गढवाल परिसरात आलेला भीषण पूर हिमनग तुटल्यामुळे आला होता, असे सांगितले जात आहे. या भागात हिमनद्या वितळल्याने छोटे तलाव तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातील पाण्याची पातळी वाढल्याने हे तलाव फुटतात, त्यामुळे नद्यांना पूर येतो. 2013 च्या केदारनाथ दुर्घटनेची उत्पत्तीदेखील हिमकडा तुटल्यानंतर आलेल्या पुरामुळे झाली आहे. चमोली जिल्ह्यातील या भागात सुमारे 1,000 ग्लेशियर्स असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तापमानवाढीमुळे मोठे हिमखंड तुटतात तेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येते. हिमस्खलनामुळे खडक आणि माती वेगळे होऊन पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. बर्‍याच भागात ग्लेशियर्स मागे पडल्यामुळे काही बर्फ हिमनद्यांपासून विलग होतो.

जागतिक तापमानवाढीमुळे हिमालयीन प्रदेशातील ग्लेशियर्सचे वेगाने वितळणे याकडे एक मोठे संकट म्हणून पाहिले पाहिजे आणि त्याद़ृष्टीने उपाययोजनांची तयारी केली पाहिजे; अन्यथा यामुळे येणारा पूर त्याच्या मार्गात येणार्‍या नागरी वसाहती, पूल, जलविद्युत प्रकल्प यासारख्या मूलभूत संरचनांचाही नाश करू शकतो.

– विलास कदम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT