Latest

Amravati crime news : पत्नी जेवण देत नाही, सतत पैसे मागते…; छळाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल

मोहन कारंडे

अमरावती; पुढारी ऑनलाईन डेस्क : सासुरवास आणि पतीच्या छळाला कंटाळून अनेक विवाहिता आत्महत्या करत असल्याच्या घटना नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने जीवन संपवल्याची खळबळजनक घटना परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. यात पतीला छळणाऱ्या पत्नीविरुद्ध परतवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशोक वसंतराव इंगोले (वय ३५, रा. हिवरा बुद्रूक, ता. नांदगाव खंडेश्वर, सध्या रा. गौरखेडा कुंभी, ता. अचलपूर) असे मृताचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक वसंतराव इंगोले यांनी १ डिसेंबर रोजी गौरखेडा कुंभी येथे जीवन संपवले. यावरून परतवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली होती. मात्र, चौकशीदरम्यान अशोक इंगोले याला त्याच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचण्यास प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पत्नी सीमा अशोक इंगोले (वय २९, रा. गौरखेडा कुंभी) हिच्याविरुद्ध परतवाडा पोलिसांनी २१ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.

अशोक आणि सीमा यांचा २०१२ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर ९ वर्षे अशोकच्या मूळ गावी हिवरा बुद्रूक येथे हे दाम्पत्य वास्तव्यास होते. यादरम्यान सीमाने गावातील बचत गटाकडून १ लाख ७० हजार रुपयांचे कर्ज काढले. पण, तिचे घरात कुणाशीही पटत नव्हते. सासरच्या मंडळीसमवेत ती सतत भांडत राहायची. तिच्या वागणुकीमुळे अशोक त्रस्त होता. यातच दीड वर्षापूर्वी अशोकसोबत भांडण करून सीमा माहेरी गौरखेडा कुंभी येथे मुलीसह निघून गेली. काही दिवसानंतर अशोकही गौरखेडा कुंभी येथे येऊन सीमासोबत राहू लागला. गौरखेडा कुंभी येथील शेरे पंजाब धाब्यावर तो मजुरी करू लागला. सीमाने काढलेल्या बचत गटाच्या कर्जाचे हप्ते तो भरत होता. मात्र, त्यानंतरही सीमा अशोकसोबत भांडायची. त्यांच्यातील नाते जवळपास संपुष्टात आले होते. तिच्या छळाला कंटाळून त्याने टोकाचा निर्णय घेतला.

वडिलांना सांगितला होता घटनाक्रम

ती अशोकला जेवायलाही देत नव्हती. सतत पैसे मागायची. हा सर्व घटनाक्रम अशोकने मृत्यूपूर्वी ३० नोव्हेंबर रोजी आपल्या आईला आणि १ डिसेंबरला दुपारी वडिलांना फोनवरून सांगितला. वडिलांसोबत फोनवर बोलणे सुरू असतानाच मध्येच फोन कट झाला आणि काही तासांनंतरच अशोकने गळफास घेऊन जीवन संपवल्याचा निरोप त्याच्या आई-वडिलांना मिळाला.

पत्नीच्या त्रासाला कंटाळून अशोकने त्याच्या राहत्या घरी गळफास घेवून जीवन संपवल्याचे साक्षीदारांनी सांगितले. साक्षीदारांचा जबाब आणि मृतकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

– संदीप चव्हाण, ठाणेदार, परतवाडा

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT