मुंबई, पुढारी वृत्तसेवा :1967 नंतर सहकार क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे आणि सहकार चळवळीचे मोठे नुकसान झाले, असे मत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी शनिवारी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच देशातील 60 कोटी नागरिक बँकेशी जोडले गेल्याचेही शहा सांगितले.
पंतप्रधान मोदींनी सहकार आणि व्यावसायिक या दोन्ही क्षेत्रांना करांच्या बाबतीत एकाच पातळीवर आणले असून केंद्र सरकार सहकार विद्यापीठाची स्थापना करणार असल्याचा पुनरुच्चार शहा यांनी केला.
मुंबई विद्यापीठ आणि सहकार भारती यांच्या वतीने आयोजित केलेल्या लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल व कुलपती रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दीनानाथ ठाकूर आदी उपस्थित होते.
2014 पर्यंत देशातील 60 कोटी नागरिक जनता या देशाच्या अर्थव्यवस्थेशी जोडलेच गेले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 60 कोटी नागरिकांना बँकेत खाते खोलून दिले. स्वत:चे हक्काचे घर दिले, पिण्याचे पाणी, वीज, स्वयंपाकाचा गॅस, शौचालय आदी सर्व गोष्टी मोफत दिल्या. तसेच प्रत्येक कुटुंबाला दर महिना पाच किलो मोफत धान्य देऊन त्यांची चिंता मिटवली, असेही अमित शाह म्हणाले.
राज्यपाल म्हणाले, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विकासाचा मार्ग सहकाराच्या माध्यमातूनच जातो. साखर कारखानदारी, दूध व्यवसायाबारोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून प्रगती होत आहे. सहकार क्षेत्रातील बदलातून शेवटच्या घटकापर्यंत विकासाचे लाभ पोहोचतील.
वर्षभरापूर्वीच्या क्रांतीला अमित शहा यांचे पाठबळ : मुख्यमंत्री
महाराष्ट्र आणि गुजरातमधील समान धागा म्हणजे सहकार चळवळ होय. त्यामुळे लक्ष्मणराव इनामदार हे या दोन्ही राज्यांतील संवादाचा सेतू होते. त्यांनी सहकार चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले, असे सहकार क्षेत्रातील लक्ष्मणराव इनामदार यांचे कार्य अनुकरणीय आहेे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. अमित शहा यांच्या कणखरपणाचा अनुभव वर्षभरापूर्वी झालेल्या क्रांतीवेळी आला. शब्द दिला की ते पूर्ण करणारच, असेही शिंदे म्हणाले.