मनिला : जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये भलतेच विचित्र कायदे पाहायला मिळत असतात. फिलीपाईन्समधील एका शहरातही असाच एक विचित्र 'स्माईल पॉलिसी रूल' आणला गेला आहे. त्यानुसार सरकारी अधिकार्यांनी नेहमी आपला चेहरा हसरा ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर या नियमाचे उल्लंघन केले तर अधिकार्यांचा तब्बल सहा महिन्यांचा पगार दंड म्हणून कापला जाणार आहे!
कोणत्याही देशांच्या 'सर्कारी' कार्यालयांमध्ये अनेक कर्मचारी (सन्माननीय अपवाद वगळता!) काडेचिराईती चेहरे करून बसलेले, तुसडेपणाने लोकांशी वागत असलेले व 'सर्कारी काम सहा महिने थांब' या म्हणीप्रमाणे काम करीत असताना दिसून येऊ शकतात. फिलीपाईन्सही याबाबतीत अपवाद नाही. सरकारी कर्मचार्यांची ही सवय बदलण्यासाठी असा अनोखा नियम करण्यात आला आहे.
'मेन आयलंड ऑफ ल्यूझॉन' या बेटावरील क्यूझॉन प्रांतात हे शहर आहे. तिथे महापौरपदी निवड होताच अगूरी नावाच्या व्यक्तीने हा नियम लागू केला. स्थानिक पातळीवर वारंवार सरकारी कर्मचारी व अधिकार्यांकडून चुकीची वागणूक मिळत असल्याची तक्रार येत असल्याने हा नियम लागू करण्यात आला. त्यानुसार शहरातील सर्व सरकारी अधिकार्यांना सतत आपला चेहरा हसराच ठेवावा लागणार आहे. यामुळे त्यांची लोकांशी असणारी वर्तणूक चांगली राहील, असा विश्वास मेयर अगूरी यांना वाटतो. स्माईल पॉलिसीचे उल्लंघन करणार्या सरकारी अधिकार्याचा तब्बल सहा महिन्यांचा पगार कापण्यात येईल, असेही अगुरी यांनी स्पष्ट केले आहे. वारंवार उल्लंघन केल्यास अधिकार्याचे निलंबनही होऊ शकते अशी तरतूद करण्यात आली आहे.