अमृत भांडवलकर
सासवड(पुणे) : पुरंदर तालुका हा अंजीर, सीताफळ लागवडीसाठी अग्रेसर आहे. तालुक्यातील सिंगापूर येथील प्रगतशील शेतकरी अभिजित गोपाळ लवांडे यांनी 30 गुंठ्यांवरील अंजिराच्या शेतीतून 14 टन विक्रमी उत्पादन घेऊन 10 लाख रुपयांचा घसघशीत नफा मिळविला आहे. यासोबतच त्यांनी सीताफळाचे देखील विक्रमी उत्पादन घेतले आहे. आता पुढील वर्षी त्यांच्या शेतातील जांभूळ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
अभिजित लवांडे यांनी 3 एकर शेतीत सीताफळाच्या फुले पुरंदर वाणाची लागवड केली आहे. गतवर्षी त्यांनी 4 लाख 68 हजार रुपयांचा नफा मिळविला. सीताफळाला 120 ते 160 रुपयांचा दर त्यांना मिळाला. अभिजित यांनी पालघर कृषी विद्यापीठांतून जांभळाचे कोकण बार्डोली हे वाण आणून पाऊण एकरात त्याची लागवड केली आहे. पुढील वर्षी जांभूळ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
दरम्यान अंजीरबागेचा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यामागे बारामतीचे उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, पुरंदरचे कृषी अधिकारी सुरज जाधव यांचे लवांडे यांना मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. लवांडे यांच्या कार्याची दखल घेऊन कृषी विभागाने त्यांची पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
शेतीपूरक व्यवसाय
लवांडे हे रोपवाटिकेचा (कानिफनाथ नर्सरी) शेतीपूरक व्यवसाय करीत आहेत. सन 2021 मध्ये अंजिराची 2 हजार व सीताफळाची 1 हजार रोपे अशी एकूण 3 हजार रोपे तयार करून विक्री केली. सन 2022 मध्ये अंजिराची 12 हजार रोपे व सीताफळाची 6 हजार, रत्नदीप पेरू 3 हजार, अशी एकूण 21 हजार रोपांची विक्री केली, तर सन 2023 साठी रोपांची आगाऊ नोंदणी करण्यात येत आहे. शेतकर्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीकडे वळावे. कृषी विभागामार्फत अनेक योजना राबविल्या जातात, त्या संधीचा लाभ घ्यावा. कृषी विद्यापीठाने तयार केलेले फळझाडांचे आधुनिक वाण खरेदी करून लागवड करावी. रासायनिकऐवजी जैविक आणि सेंद्रिय पद्धतीने उत्पादित कृषिमालाला चांगली मागणी असल्याने शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे.
– अभिजित लवांडे, शेतकरी, सिंगापूर