पुढारी ऑनलाईन डेस्क : पुष्पाच्या निमित्ताने पुन्हा एकदा साऊथच्या सिनेमांचा दबदबा सिद्ध झाला आहे. उत्तरभारतात पुष्पा चित्रपटाच्या हिंदी भाषेतील व्ह्रर्जनने ८० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. या यशाने प्रेरित होऊन अल्लू अर्जन (allu arjun) याने त्याचा मागील वर्षी आलेला चित्रपट 'अल वैकुंथापुरमुलू' Ala Vaikunthapurramuloo या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन २६ जानेवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे. हा प्रयोग पुन्हा एकदा यशस्वी झाला तर फेब्रुवारी महिन्यात रंगस्थलम सुद्धा रीलीजसाठी सज्ज ठेवण्यात आला आहे.
सध्या अल्लू अर्जुन (allu arjun) याचा पुष्पा सिनेमा सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. साऊथ बरोबर त्या चित्रपटाच्या हिंदी डब व्हर्जनने महाराष्ट्रासह उत्तर भारतात देखिल तुफान कमाई चित्रपटाने केली आहे. या हिंदी भाषेतील व्हर्जनने ८० कोटीहून अधिक गल्ला जमवला आहे. तसेच सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा पाहायला मिळत असून या ठिकाणी देखिल त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या आधी बाहुबली या चित्रपटाच्या सिरीजला देखिल या हून अधिक प्रसिद्धी मिळाली होती. या यशाने अल्लू अर्जुनसह साउथचे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक चांगलेच भारावले आहेत.
कोरोनाच्या काळात पुन्हा एकदा नियमांची कडक अमंलबजावणी केली जात आहे. निर्बधांसह चित्रपटगृहे चालू झाली पण बॉलिवूडच्या सिनेमांना त्याचा फारसा लाभ घेता आला नाही. पुन्हा चित्रपटगृहे सुरु झाल्यावर 'सूर्यवंशी' व हॉलिवूडचा स्पायडरमॅन या चित्रपटांना प्रेक्षक लाभला पण इतर चित्रपटांनी फारच निराशाजनक कामगीरी केली. पण, या सगळ्यात अल्लू अर्जुनच्या (allu arjun) 'पुष्पा' चित्रपटाने मात्र आश्चर्यकारक कामगिरी नोंदवली. साऊथच्या चित्रपटांना उत्तरेमध्ये देखिल डोक्यावर घेतले जाते म्हटल्यावर आता तेथील चित्रपट निर्माते आपले इतरही चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित करुन गल्ला जमविण्याचा विचार करु लागले आहेत.
अल्लू अर्जुनने हाच विचार करुन त्याचा मागील वर्षी (२०२१) प्रदर्शित झालेला 'अल वैकुंठपुरमुलू' ( Ala Vaikunthapurramuloo) हा चित्रपट हिंदी भाषेत प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. प्रजासत्ताक दिनी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे. या चित्रपटाने पुन्हा एकदा गल्ला जमावला तर रामचरणचा रंगस्थलम ( Rangasthalam ) हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये रीलीज केला जाईल.
याचाच अर्थ की यंदाच्या वर्षी २०२२ मध्ये सर्वत्र आपल्याला साऊथचा धमाका पहायला मिळणार आहे. साऊथचे जे चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित होतील त्यांना जर असेच यश मिळाले. हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले तर मात्र पॅन इंडिया या धर्तीवर साऊथचे सर्व सिनेमा एकाच वेळी भारतभर प्रदर्शित होताना आपल्याला पहायला मिळतील आणि हिंदी भाषिकांना देखिल साऊथच्या सिनेमांची कलाकृती ज्या त्या वेळी अनुभवता येईल.