Latest

‘या’ देशातील सर्व ग्लेशियर्स आता झाले नष्ट!

Arun Patil

काराकास : दक्षिण अमेरिकेतील व्हेनुझुएला हा जगातील असा पहिला देश बनला आहे जिथे सर्व ग्लेशियर्स आता नष्ट झाले आहेत. व्हेनेझुएलाने आता आपले शेवटचे शिल्लक राहिलेले ग्लेशियरही गमावले आहे. हे ग्लेशियर इतके आकसले आहे की आता हवामान संशोधकांनी त्याला बर्फाचे एक छोटेसे मैदान ठरवले आहे. आधुनिक काळात आपले सर्व ग्लेशियर्स गमावणारा व्हेनेझुएला हा जगातील पहिला आणि एकमेव देश आहे.

इंटरनॅशनल क्रायोस्फीयर इनिशिएटिव्ह (आयसीसीआय) ने म्हटले आहे की, व्हेनेझुएलामधील एकमात्र शिल्लक असलेले ग्लेशियर 'हम्बोल्ट' हे अतिशय छोटे बनले होते. हम्बोल्ट शिखरावरील या ग्लेशियरला 'ला कोरोना' असेही म्हटले जाते. आता त्याला ग्लेशियर म्हणण्याऐवजी 'आईस फिल्ड' म्हटले जाईल. त्याला तशाच पद्धतीने वर्गीकृत करण्यात आले आहे. व्हेनेझुएलानंतर इंडोनेशिया, मेक्सिको आणि स्लोव्हेनिया हे देशही ग्लेशियरमुक्त होण्याचा धोका आहे.

गेल्या शतकात व्हेनेझुएलाने आपली सहा ग्लेशियर्स गमावली होती. हवामान बदलामुळे तापमानवाढ होऊन जगभरातील ग्लेशियर्समधील बर्फ वितळू लागले आहे. त्यामुळे जगातील समुद्रांच्या पाण्याचा स्तरही वाढत आहे. डरहम विद्यापीठाच्या ग्लेशियोलॉजिस्ट कॅरोलिन क्लासन यांनी सांगितले की, 2000 च्या दशकानंतर व्हेनेझुएलाच्या अखेरच्या ग्लेशियरवरही अधिक बर्फ जमा झाले नाही.

यावर्षी मार्चमध्ये कोलंबियातील लॉस एंडीज विद्यापीठाच्या संशोधकांना आढळले की, हे ग्लेशियर 450 हेक्टर जागेतून कमी होऊन ते केवळ दोन हेक्टर जागेपुरते मर्यादित राहिले आहे. अर्थात ग्लेशियर म्हणून ओळखण्यासाठी बर्फाच्या एका तुकड्याचा किमान आकार ठरवण्यासाठी जगात कोणतेही वैश्विक मापदंड नाहीत. मात्र, अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या मते सर्वसाधारणपणे स्वीकृत दिशानिर्देश दहा हेक्टरचे आहे. 'नासा'ने 2018 मध्ये या ग्लेशियरला व्हेनेझुएलामधील अखेरचे ग्लेशियर म्हटले होते. हे ग्लेशियर वाचवण्यासाठी व्हेनेझुएला सरकारनेही बरेच प्रयत्न केले, पण ते अयशस्वी ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT