Latest

Lok Sabha Election : “हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवारांच्या पायाला भिंगरी”

Shambhuraj Pachindre

शिरढोण : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आता फक्त दहा दिवस उरले आहेत, तर प्रचाराला फक्त आठ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारांचा चांगलाच धुरळा उडवला आहे. प्रमुख नेत्यांच्या सभांबरोबरच कॉर्नर सभा, मतदारांच्या गाठीभेटी, गावबैठका यावर प्रामुख्याने उमेदवारांसह त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चांगलेच रान पेटवले आहे. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पायाला भिंगरी लावल्यासारखे उमेदवार आपापला मतदारसंघ पालथा घालत आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे.

हातकणंगले मतदारसंघांमध्ये सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवार आमचाच निवडून येणार यावरून पैजा लावल्या जात आहेत. महाविकास आघाडी, महायुती, स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच वंचित बहुजन आघाडीनेही प्रचारासाठी रान उठवले आहे. मात्र अजूनही म्हणावे तसे चित्र स्पष्ट झाले असे दिसून येत नाही. मात्र, तिरंगी लढतीमध्ये कांटे की टक्कर होणार असल्याचे बोलले जात आहे.
उमेदवार व कार्यकर्ते सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत सर्वच गावात पोचण्यासाठी आता-पीटा करत आहेत. हातकणंगले मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे धर्यशील माने, महाविकासआघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यात तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. तर वंचितचे डी. सी. पाटील यांच्यासह एकूण २७ उमेदवार असल्याने प्रत्येकाकडून आपल्या उमेदवाराबाबत बेरजेचे गणित सांगत जोरदार फिल्डिंग लावल्याचेही आवर्जून सांगण्यात येत आहे.

मात्र, वंचितनेही प्रचार जोरात सुरू केला आहे. विजयाचा केंद्र बिंदू इचलकरंजी असल्याने सर्वच पक्षांनी इचलकरंजीच्या मतदानाचा परिपूर्ण अभ्यास करून जास्तीतजास्त मतदान कशा प्रकारे आपल्या पदरात पाडता येईल यासाठी मोठ्या प्रमाणात भेटीगाठी, बैठका यांचा जोर लावला आहे. काही ठिकाणी नाराजी तसेच हेव्यादाव्याचा धूर उठल्याने उमेदवारांना विरोधकांबरोबर लढताना आपल्याच स्वकीयांचेही व्यवस्थापन करावे लागणार असल्याने त्यांची क्रियाशक्ती अधिक खर्च होत असल्याचे दिसून येते.लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने आता रंगत चढू लागली आहे.

"प्रचंड उन्हात उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पायाला भिंगरी लावल्यासारखे संपूर्ण मतदारसंघात मतदारांच्या भेटी घेत आहेत. वेळ कमी असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करत असल्याचे चित्र आहे. ५मे रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचाराच्या तोफा थंड होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांकडून मतदारांना सुट्टीच्या दिवशी गाठण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. त्यांची भेट घेऊन निवडून देण्यासाठी आम्हालाच मत द्या, अशी विनंती मतदारांना केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT