वॉशिंग्टन : अमेरिकेच्या संरक्षण विभागाने एलियनच्या अस्तित्वाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांत अज्ञात उडणार्या वस्तूंचे शेकडो अहवाल 'पेंटागॉन' म्हणजेच अमेरिकेच्या संरक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. मात्र, आतापर्यंत एलियनचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. सध्या या अहवालांवर अभ्यास सुरू आहे. 'पेंटागॉन'चा हा अहवाल खूपच धक्कादायक आहे. कारण, अमेरिकेचे संरक्षण मंत्रालयदेखील या वर्षापासून परग्रहावरील जीवांचा शोध घेण्यासाठी 'नासा'ची मदत घेत आहे. यासाठी 'नासा' व 'पेंटागॉन'च्या अधिकार्यांची एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे.
'पेंटागॉन'ने जुलैमध्ये ऑल-डोमेन अॅनॉमली रिझोल्यूशन ऑफिसची स्थापना केली होती. त्याद्वारे केवळ आकाशातील अज्ञात वस्तूच नव्हे, तर भूगर्भात, पाण्याखाली किंवा अंतराळातील संभाव्य गूढ जीवनाचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. अमेरिकेच्या नौदलाने अज्ञात उडत्या तबकड्या पाहण्यात आल्याचे अहवाल देण्यास सुरुवात केल्यानंतर 'पेंटागॉन'ने हा विषय गंभीरपणे घेतला आहे. नौदलाच्या लष्करी वैमानिकांनी आकाशात अनेक विचित्र घटना आणि विमाने पाहिली आहेत.
अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने उघड केलेल्या माहितीनुसार, 2004 ते 2021 दरम्यान उडत्या तबकड्यांसह अन्य 144 विचित्र घटना घडल्याची नोंद करण्यात आली आहे. तथापि, त्यातील केवळ 80 घटना सेन्सरवर कॅच करण्यात आल्या. 'नासा'खेरीज हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञही एलियन्सचा शोध घेत आहेत. यावर्षी, संशोधन करणार्या शास्त्रज्ञांच्या चमूने म्हटले आहे की, मानवाशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी एलियनदेखील प्रयत्न करत आहेत.