Latest

नगर: अकोले तालुका बनतोय वन्य जीव प्राण्यांच्या तस्करीचे केंद्र

अमृता चौगुले

अकोले पुढारी वृत्तसेवा : शहापूर, आळेफाटा परिसरात बिबट्याच्या कातडी, नखांची तस्करी करणाऱ्या अकोले तालुक्यातील उडदावणे व शरणखेल येथील टोळीच्या मुसक्या पोलीस आणि वनविभागाने आवळल्या आहेत. या टोळ्यांमुळे बिबट्यासह वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अकोल्यात गंभीर बनला आहे. अकोले हे तालुका बिबट्याच्या कातडी, नखांच्या तस्करीचे केंद्र बनले आहे.

अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील कळसुबाई – हरिश्चंद्र गड अभयारण्यातील उडदावणे परिसरात गेल्या दोन आठवड्यापुर्वी गावातील नागरिकांना बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला होता. बिबट्याचे नखे आणि काही अवयव काढुन त्याच्या शरीराचा बाकीचा जाळुन पुरावा नष्ट करण्यात आला. आठवडाभरानंतर बिबट्याचे नख विक्रीसाठी आलेल्या तस्करांना शहापूरच्या वनविभागाने चांढे नाक्यावर नकली ग्राहक पाठवुन ताब्यात घेतले. भाऊ गांगड (वय ३४), काळु गिऱ्हे (वय २४) आणि पांडुरंग उघडे (रा.उडदावणे) या तिघांना ताब्यात घेऊन बिबट्याची सहा नखे व मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर डोळखांब वनपरिक्षेत्र कार्यालयात भा.दं.वि. वनसंरक्षक कायदा १९७२ च्या कलम ९,५१, ४८ क, ए आणि ४९ ब, अ ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेल्या एप्रिल महिन्यात पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे नाशिक महामार्गावरील हॉटेल फाउंटन समोरून बिबट्याचे कातडे हस्तगत करण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले होते. बिबट्याच्या कातडी, नखांची तस्करी व शिकार करणाऱ्या टोळ्या अकोले तालुक्यासह पुणे, ठाणे जिल्ह्यात सक्रिय असल्याचे वास्तव समोर आले आहे. या टोळ्यांवर वनविभाग आणि वन्यजीव विभागाने लक्ष घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

प्राणी ठरताहेत भुकबळीचे शिकार

अकोले तालुक्यातील वनविभाग व अभयारण्यात बिबट्या, तरस, रान डुक्कर, मोर, ससा, निलगायी, गवा या सारख्या प्राण्यांच्या जिवीताला धोका पोहचत असल्याने वन्य प्राण्यांच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तर अकोले तालुक्यातील वनविभागाच्या जंगलात आणि अभयारण्यात बिबटे, तरस, रानडुक्कर या प्राण्यांची संख्या दिवसेदिवस वाढताना दिसत आहे. जंगलात खाद्य, पाणी, निवारा या मुलभूत गरजांची कमतरता असल्याने या प्राण्यांनी जंगलातुन शहराच्या दिशेने वाटचाल केल्याने अकोले, निळंवडे, पाडाळणे, निब्रळ, राजूर परिसरात माणसासह शेळ्या, कुत्रे, कोंबड्या, गायीवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढल्याचे वनविभागाच्या रजिस्टरवर नोंदीवरुन दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT