धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रम स्थळावर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे झेंडे लावण्यात आले. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस हा तुमच्या समवेत सत्तेतील पक्ष असल्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ही झेंडे लावा, अशी अपेक्षा आज (दि.१०) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात यापूर्वी गेल्या 35 वर्षापासून शिवसेना, भाजपची युती असल्यामुळे ते झेंडे लावले आहेत. पण यापुढे आता राष्ट्रवादीचे ही झेंडे लावले जातील, अशी ग्वाही दिली.
धुळ्यात आज राज्य राखीव दलाच्या मैदानावर 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम राबवण्यात आला. हा कार्यक्रम दुपारी एक वाजेला होणार होता. मात्र मुंबई येथील महत्त्वाची बैठक आटोपून विमानाने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे धुळे येथे उशिराने पोहोचले. यावेळी पाऊस सुरू असल्यामुळे धावपट्टीवर विमान उतरण्यास अडचण निर्माण झाली. त्यामुळे विमान जळगाव येथे उतरवण्यात आले. यानंतर तेथून मोटारीने दोन्हीही नेते धुळ्यात पावणे पाच वाजेपर्यंत पोहोचले. तोपर्यंत धुळ्यात कार्यक्रमात लाभार्थ्यांबरोबर मान्यवरांनी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यभरामध्ये शासन आपल्या दारी हा उपक्रम यशस्वी होतो आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात कळा येत आहे. त्यांना देखील गर्दीचे हे चित्र दाखवले पाहिजे. राज्यातील हे सरकार लोकाभिमुख कार्यक्रम हाती घेत आहे. मात्र, सरकार दारोदार भटकत असल्याची टीका होते. पण हे सरकार मायबाप जनतेच्या विकासासाठी काम करणारे सरकार आहे. त्यामुळे नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे. जनतेच्याच आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो असल्याने मी लोकांपर्यंत जातो आहे. पण विकासाचे हे काम घरी बसणाऱ्यांना कळणार नाही, असा टोला त्यांनी लावला. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, पंतप्रधान भारताला महासत्ता करण्याच्या दिशेने काम करीत आहेत. प्रत्यक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे स्वप्न मोदी पूर्ण करत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शासन आपल्या दारी या उपक्रमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 75 हजार लाभार्थ्यांना घरपोच योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. हा उपक्रम जनतेसाठी चांगला असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या उत्तर भारतामध्ये पावसाने कहर सुरू केला आहे. मात्र अजूनही महाराष्ट्रातल्या बहुसंख्य भागांमध्ये पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे पांडुरंगाकडे आपण सर्वच राज्यात शेतीला उपयोगी पडणारा पाऊस पडू दे ,अशी प्रार्थना देखील करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्यात 37000 पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचे मला भाग्य लाभले असून धुळे जिल्ह्यात बाराशे कोटी रुपयांची योजना मंजूर केल्या आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनेवर देशात आठ लाख कोटी रुपये खर्च होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मंत्री दादा भुसे यांनी देखील महाराष्ट्र शासन लोकाभिमुख करण्याचा हा प्रयत्न यापुढे देखील सुरू राहणार असल्याचे मत व्यक्त केले. तर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शासकीय योजना आणि त्यांचा आतापर्यंत देण्यात आलेला लाभ याविषयीची सविस्तर माहिती सांगितली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना विदर्भाला त्यांनी एक दमडी देखील दिली नाही. आणि आता ते पुतना मावशीचे प्रेम दाखवत आहेत. पण लोक तुम्हाला उभे करणार नाही, असा टोला देखील त्यांनी लावला.
या कार्यक्रमास मंत्री अनिल पाटील यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल, आमदार मंगेश चव्हाण, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार मंजुळाताई गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, महापौर प्रतिभाताई चौधरी, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर दराडे, खासदार हिनाताई गावित, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अश्विनी पवार, आमदार काशीराम पावरा, यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा