पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने महायुतीत दावा केला असला, तरी या दोन्ही मतदारसंघांत त्यांच्याकडे संपूर्ण मतदारसंघात प्रभाव आणि माहिती असलेला उमेदवारच नाही. बारामतीत घरातला उमेदवार सोडता दुसरा असा उमेदवार नाही. बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा किंवा मुलगा पार्थ वगळता तिसरा संपूर्ण मतदारसंघात ओळखीचा उमेदवार अजित पवार गटाकडे नाही. घरातील उमेदवार द्यायचा नाही, असा विचार अजित पवार यांनी केल्यास संपूर्ण मतदारसंघात प्रभाव, काम, ओळख, कार्यकर्ते असलेला उमेदवार त्यांच्याकडे नाही, तसे झाल्यास या मतदारसंघात शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे, भाजपच्या कांचन कुल आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असे तगडे उमेदवार महायुतीत आहेत; परंतु ते आपला पक्ष सोडून अजित पवार गटाकडून निवडणूक लढविणे शक्य नसल्याने, तर असा चेहरा अजित पवार यांच्याकडे नसल्याने या मतदारसंघात अजित पवार कोणता उमेदवार देणार, याची उत्सुकता आहे.
अजित पवार देतील तो उमेदवार निवडून येईल, अशी स्थिती सध्या मतदारसंघात असली, तरी स्व-प्रभाव नसलेला उमेदवार दिला गेला, तर अजित पवार यांना ऐननिवडणुकीत बारामती मतदारसंघातच फार काळ अडकून राहावे लागण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या मदतीने खासदार शरद पवार यांना बारामतीत अडकून राहावे, यासाठी जो डाव भाजपचे ज्येष्ठ नेते टाकण्याच्या प्रयत्नात आहेत, तो डाव अजित पवार यांच्यावरच पडण्याची शक्यता यामुळे जास्त आहे. अशा राजकीय स्थितीमुळे अजित पवार यांना आपल्या घरातच उमेदवारी द्यावी लागण्याची शक्यता आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातही अजित पवार यांच्या गटाकडे संपूर्ण लोकसभा मतदारसंघावर प्रभाव पाडू शकेल, असा उमेदवार सध्या तरी नाही. दिलीप मोहिते (खेड-आळंदी), चेतन तुपे (हडपसर), सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव-शिरूर), अतुल बेनके (जुन्नर) हे आमदार अजित पवार गटाकडे आहेत; परंतु यापैकी कोणीही खासदारकीला इच्छुक नाही. एवढेच नव्हे, आपल्या गळ्यात खासदारकीची उमेदवारी पडू नये, याचीच काळजी ते घेतील. अशावेळी अजित पवार ऐनवेळी कोणाला उभे करणार, याकडे लक्ष असेल. या चेहर्यांशिवाय माजी आमदार विलास लांडे हे उमेदवार होऊ शकतात, परंतु ते अद्याप मतदारसंघात सक्रिय झालेले दिसत नाहीत. शिरूरचा गड अजित पवार कशाच्या आधारे लढणार आहेत, हा प्रश्नच आहे.