बारामती, पुढारी वृत्तसेवा: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला. आता रब्बी हंगामही त्याच मार्गावर आहे. मी दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांना भेटून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आता ते दौरा करणार असल्याचे तुम्ही सांगत आहात. अतिवृष्टीने पार वाटोळं झाल्यावर दौरा करता का? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
बारामती येथे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या 'गोविंदबाग' या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार यांनी यावेळी अधिक राजकीय भाष्य करण्यास नकार दिला. दिवाळीसारखा आनंदाचा सण असल्याने मी राजकीय बोलून विरजन घालणार नाही. आजची दिवाळी संपू द्या, मी किंवा माझा पक्ष यासंबंधी उद्यापासून आमची भूमिका मांडू असे ते म्हणाले.
दिवाळी पाडवा, भाऊबीजेच्या, नूतन वर्षाच्या राज्यातील जनतेला पवार यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, पाडवा व भाऊबीज एकाच दिवशी हा योग यंदा जुळून आला. गेली दोन वर्षे कोरोनामुळे महत्त्वाचे सण साजरे करता आले नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पाडव्याला जनतेला भेटण्याची वर्षानुवर्षाची परंपरा आहे. या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांना ते भेटत असतात. आज सकाळी साडे सात वाजल्यापासून ते लोकांना भेटले आहेत.
माझ्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार, पार्थ पवार हे ही सोबत होते. एवढा मोठा समाज भेटीसाठी येतो, त्याचे माझ्या कुटुंबातील काही तरुणांनाही कुतुहल होते. त्यामुळे काहीजण येथे थांबले होते. आम्ही चौघे तर लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने आमची जनतेशी नाळ जोडली गेलेली आहे. पाऊस उघडल्याने आजचा सोहळा आनंदात पार पडला. पोलिस यंत्रणेने, आमच्या कार्यकर्त्यांनी काळजी घेतली. अनेकांना आमच्यासोबत फोटो काढायचे होते. परंतु वेळेमुळे त्यावर मर्यादा आल्या. त्यातून कोणी गैरसमज करून घेऊ नये.
राष्ट्रवादी पुढील अनेक वर्षे सत्तेत येणार नाही, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी वक्तव्य केले. यासंबंधी माजी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राष्ट्रवादी सत्तेत येईल की नाही, हे देसाई यांना लवकरच कळेल. सर्वसामान्यांमध्ये असलेला रोष त्यांना अद्याप समजलेला नाही. राज्य शासनाने मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. एसटी कर्मचाऱयांचे विषय मार्गा लावावेत. वीज बिल माफी करावी. भविष्यातील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल. आजच्या दिवशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटण्याची अनेक वर्षांपासूनची रित आहे. त्यांना भेटून मिळणारी प्रेरणा वर्षभर कामासाठी उपयोगी येते.