Latest

अमेरिकेतील भारतीयांचा मदतीचा हात अन् ऐश्वर्याच्या अंत्यदर्शनाची आईची इच्छा पूर्ण

दिनेश चोरगे

कोल्हापूर : अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील डेट्रॉइटमध्ये डेटा सायन्समध्ये करिअर करणार्‍या ऐश्वर्या भिवटे-देशमाने यांचा 4 मार्च रोजी झालेल्या कार अपघातात मृत्यू झाला, तर त्यांचे पती पार्थ गंभीर जखमी झाले. या बातमीने भिवटे आणि देशमाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. स्वप्नांचा पाठलाग करत दूरदेशी गेलेल्या लेकराचे अंत्यदर्शन तरी होईल का, असे वाटून त्यांच्या आईचा जीव कासावीस झाला. या कठीण परिस्थितीत मिशिगनमधील भारतीय समुदाय मदतीसाठी या कुटुंबाच्या मागे उभा राहिला. भिवटे कुटुंबानेही पार्थिव परत आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना यश येऊन 10 दिवसांनंतर ऐश्वर्याचे पार्थिव कोल्हापुरात पोहोचले अन् मुलीच्या अंत्यदर्शनाची आईची आणि निकटवर्तीयांची इच्छा पूर्ण झाली.

सातारा माहेर आणि कोल्हापूर सासर असलेल्या ऐश्वर्या भिवटे-देशमाने 12 हजार किलोमीटरवर असणार्‍या अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील डेट्रॉइटमध्ये पतीसोबत राहत होत्या. डेटा सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या ऐश्वर्यासमोर उज्ज्वल करिअर होते; पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 4 मार्च रोजी या दाम्पत्याच्या कारला भरधाव एसयुव्ही धडकली आणि सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. ऐश्वर्या जागीच ठार झाल्या तर गंभीर अवस्थेतील पार्थ यांना रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.
मिशिगन राज्यातील भारतीय समुदायात ही बातमी वेगाने पसरली. पार्थ यांच्यावर उपचार सुरू झाले होते. सुदैवाने त्यांची प्रकृती सुधारत होती. मात्र, ऐश्वर्या यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचे हा प्रश्न पार्थ यांच्या भगिनी निकिता यांच्यासमोर होता. त्यांनी कुटुंबाला कळवल्यानंतर ऐश्वर्या यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याची त्यांच्या आईची इच्छा असल्याचे त्यांना कळवले गेले. एवढ्या अंतरावर पार्थिव आणणे हे एक आव्हानात्मक काम होते. कारण त्यासाठी येणारा खर्च, अमेरिकन सरकारच्या सर्व परवानग्या हे पूर्ण करणे आणि ते पूर्ण होईपर्यंत मृतदेह जतन करून ठेवणे जिकिरीचे होते.

मिशिगन येथील भारतीय समुदाय या दुःखाच्या क्षणी पार्थ यांच्या भगिनी निकिता यांच्या मागे उभा राहिला. सर्वांनी एकत्र येऊन पार्थ यांच्यावर उपचाराबरोबरच ऐश्वर्याचे पार्थिव मायदेशी परत पाठवण्यासाठी निधी संकलन केले. त्यासाठी अनेक हात पुढे सरसावले. या मोहिमेतून 83 हजार डॉलर्स जमा झाले. भारतीय दुतावासानेही चांगले सहकार्य केले. त्यातून अमेरिकेतून कार्गो फ्लाईटमधून ऐश्वर्याचे पार्थिव बुधवारी भारतात आणि त्यानंतर कोल्हापुरात आले. त्यामुळे आईला तसेच सर्व निकटवर्तीयांना ऐश्वर्याचे अंत्यदर्शन घेणे शक्य झाले.

मिशिगनमधील भारतीय समुदायाचे मोलाचे सहकार्य

या घटनेने कुटुंबावर मोठा आघात झाला. त्यात मुलीच्या पार्थिवाचे शेवटचे दर्शन घ्यायचे अशी इच्छा त्यांच्या आईने व्यक्त केली. आम्ही कुटुंबीयांनी लागेल तो खर्च करण्याची तयारी केली. त्यात मिशिगनमधील भारतीय समुदायाचे मोलाचे सहकार्य मिळाले. त्यामुळे अल्पकाळात पार्थिव कोल्हापुरात आले. अन्यथा अशा प्रकारे पार्थिव आणण्यासाठी काही आठवडे लागतात असा पूर्वीचा अनुभव आहे, असे पार्थ यांचे बंधू तुषार भिवटे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT