Latest

महाराष्ट्रात चक्क रक्तातून एड्सचा संसर्ग वाढला

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  रक्तपेढ्यांमधून देण्यात आलेल्या रक्तातून एड्सचा संसर्ग महाराष्ट्रात वाढल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गतवर्षी जुलै २०२२ पर्यंत म्हणजेच केवळ ६ महिन्यात तब्बल २७२ लोकांना रक्तातून एड्सची बाधा झाली. त्याच्या आधीच्या वर्षात न २०२१ मध्ये ११८ जणांना अशा प्रकारे एड्सची बाधा झाली होती.

२०२१ ते २०२२ या दरम्यान महाराष्ट्रात रक्तातून एड्सचे संक्रमण होण्याचे प्रमाण चार पटींनी वाढले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी केलेल्या माहिती हक्क अर्जामुळे ही माहिती समोर आली आणि एड्ससारखा दुर्धर आजार केवळ असुरक्षित लैंगिक संबंधांतूनच होतो हा भ्रम दर झाला. त्याचबरोबर रक्तपेढ्यांच्याबाबतीत सरकारला कडक धोरण स्वीकारावे लागेल, अशी – गरजही निर्माण झाली.

सध्या राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये एन्झाईम लिंक इम्यून सोरबंट अॅसी टेस्टच्या (ईएलआयएसए) माध्यमातून रक्ताची चाचणी केली जाते. परंतु, या चाचणीत प्रचंड त्रुटी आहेत. एड्स सोसायटीचे भारतातील अध्यक्ष डॉ. ईश्वर गिलाडा यांनी सांगितले, आजच्या काळातही रक्तातून एड्सचे संक्रमण वाढत असेल तर तो एक गुन्हा आहे. न्युक्लेइस अॅसिड अॅम्प्लिफिकेशन टेस्टच्या (नॅट) माध्यमातून हे प्रमाण कमी करता येऊ शकते. रक्तदाता तीन दिवसांपूर्वीही एड्सग्रस्त झाला असेल तरीही त्याच्या रक्तातील संक्रमण या चाचणीच्या माध्यमातून पकडले जाऊ शकते.

शासकीय रक्तपेढीत काम करणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले, की रक्ताच्या माध्यमातून एड्सचे संक्रमण होत आहे, हे सत्य आहे. रक्तपेढीने नॅट किंवा इतर अत्याधुनिक चाचण्या माफक दरांमध्ये करायला हव्यात. रक्तदात्याच्या इतिहासाची तपासणी करायला हवी. एकपेक्षा जास्त सेक्स पार्टनर असणे, वेश्यागमन करणे, साध्या दुकानांमधून टॅट्यू काढणे याची माहिती घेतली पाहिजे. सध्या एक डॉक्टर ३०० ते ५०० रक्तदात्यांची माहिती केवळ तीन ते चार तासांमध्ये घेतो. सरकारने मनुष्यबळ वाढविण्यावरही भर द्यायला हवा.

  •  १९८९ मध्ये डॉ. ईश्वर गिलाडा यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, असोसिएटेड लॅब्ज, भारत सिरम्स आणि मुंबई आणि ठाण्यातील १५ रक्तपेढ्यांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात सुरक्षित रक्ताबद्दल जनजागृती झाली. त्यातून शेकडो एड्स बाधित रक्तदाते सापडले. सुमारे ९ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर १९९८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रक्तपेढीत रक्त घेण्यापूर्वी एड्सची चाचणी अनिवार्य केली. तरीही रक्तपेढ्यांच्या पातळीवर अजूनही जीवाशी खेळणारा हा ढिसाळपणा सुरू असल्याचे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT