Latest

Amol Kolhe : ‘सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी, विनाकारण मारी धाडीवर धाडी’

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :   

मंत्री नवाब मलिक यांना ईडी कार्यालयाकडून आज सकाळी अटक करण्यात आली. अटकेनंतर त्‍यांची तब्‍बल 8 आठ तास चौकशी करण्यात आली. चौकशी नंतर त्‍यांना कोर्टात हजर करण्यात आले आहे.

राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला असतानाच ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी मागील आठवड्यात दक्षिण मुंबईत काही ठिकाणी छापे टाकले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहीम याच्या मालमत्तांशी संबंधित प्रकरणात त्याचा जेलमध्ये असलेला भाऊ इक्बाल कासकर, मृत बहीण हसीना पारकर यांच्या घरांसह अन्य काही ठिकाणी ईडीच्या पथकांनी छापे टाकले होते. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना समन्स बजावण्यात आले होते.

शरद पवार

मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्‍हणाले,
जे लोक केंद्र सरकारच्या विरोधात किंवा यंत्रणेच्या विरोधात स्वच्छ भूमिका मांडत आहेत, त्यांना त्रास देण्याचा प्रकार घडत आहे. मलिक उघडपणे बोलत असत. त्यामुळे आज ना उद्या कधीतरी हे घडेल याची खात्री होती. कोणी मुस्लिम कार्यकर्ता असला तर दाऊदचे नाव घ्यायचे आणि आरोप करायचे. यात काही नवीन नाही. पण खरे काय हे कुणालाही माहिती नाही.मी राज्याचा मुख्यमंत्री असताना माझ्यावरही असाच आरोप झाला होता. त्यानिमित्ताने राज्यात एक वातावरण निर्माण झाले होते. आज त्या गोष्टीला 25 वर्ष झाली. पण आजही तशीच नावे घेऊन लोकांना बदनाम करून सत्तेचा गैरवापर करण्याचे काम सुरु आहे. असे शरद पवार म्‍हणाले.

नितेश राणे :

नवाब मलिकला ईडी कार्यालयात आणण्यात आले आहे हे प्रत्येकाला माहीत असेल अशी आशा आहे 2 दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग लिंक्सची चौकशी करा आणि काल रात्री त्याने बिर्याणी खाल्ले की नाही हे विचारू नका!
त्याला हिरो बनवणे थांबवा! राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे! दाऊद हा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे. नवाब गद्दर आहे! असे नितेश राणे यांनी टिृट केले आहे.

किरीट सोमय्या :

अनिल देशमुख नंतर आत्ता नवाब मलिक जेल मधे. अनिल परब नी आत्ता हिशोब द्यावा लागणार
नवाब मलिक यांच्यासह अनिल देशमुख, अनिल परब यांचे उद्धव ठाकरे सरकारने अशा सर्व घोटाळेबाज नेत्‍यांचा हिशोब द्यायला पाहिजे. असे किरीट सोमय्या म्‍हणाले.

चंद्रकांत पाटील  :

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना म्‍हणाले, ईडीने नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर कॅबिनेट मंत्रीपदावर राहण्याचा त्यांना नैतिक आणि कायदेशीर अधिकार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यायला हवा, अन्यथा भारतीय जनता पार्टीला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. असे चंद्रकांत पाटील म्‍हणाले.

तसेच पुढे बोलताना ते म्‍हणाले, ज्या मंत्र्यांवर अशाप्रकारचे आरोप होऊन अटक होईल, त्या प्रत्येक मंत्र्याने राजीनामा दिलाच पाहिजे. मविआ सरकारने घटना पायदळी तुडवल्याची २२ पानी यादी माझ्याजवळ आहे. असे चंद्रकांत पाटील म्‍हणाले.

अमोल कोल्‍हे :

सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी विनाकारण मारी धाडीवर धाडी सलते सत्तेवरील महा-आघाडी म्हणून कमळाबाई ती लाविते काडी तपासयंत्रणा झाल्या कमळीच्या सालगडी पाकळ्यांमध्ये नाहीत का काहीच भानगडी? पण लक्षात ठेवा… पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादी गडी असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल कोल्‍हे टिृट करत म्‍हणाले.

संजय राऊत

शिवसेनेचे नेते संजय राऊत मलिकांच्या अटके नंतर  म्‍हणाले,
महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत. चालू द्या. एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये. लढत राहू आणि जिंकू.
कंस आणि रावण सुध्दा मारले गेले. हेच हिंदुत्व आहे.  असे संजय राऊत म्‍हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT