हेमंत साेरेन 
Latest

Jharkhand CM Hemant Soren | ईडी छाप्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन नॉट रिचेबल; BMW कार जप्त, अटकेची शक्यता?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कथित जमीन फसवणूक घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी सोरेन यांच्या दिल्लीतील शांती निकेतनमधील घरासह ३ ठिकाणी छापेमारी केली होती. दरम्यान, ईडी पथक सोमवारी रात्री उशिरा झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या घरातून बाहेर पडले. कारण ते मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी करू शकले नाहीत. पण ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार आणि कागदपत्रे असलेली बॅग तेथून निघताना जप्त केली. (Jharkhand CM Hemant Soren) तसेच त्यांच्या घरातून ३६ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.

दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीच्या सर्व आमदारांना रांचीमध्ये राहण्यास सांगितले आहे आणि राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे झारखंडमध्ये राजकीय हालचाली वेगाने सुरु आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) हे झारखंडमधील सत्ताधारी आघाडीचा भाग आहेत.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घरी बोलावण्यात आलेली ही बैठक सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आहे आणि ईडीने बुधवारी जमीन फसवणूक प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करण्याचे ठरवले आहे. याबाबतची माहिती झारखंड मुक्ती मोर्चाचे सरचिटणीस आणि प्रवक्ते विनोद कुमार सिंह यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

सोरेन यांनी ईडीला पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता रांची येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी कथित जमीन घोटाळ्याच्या संदर्भात म्हणणे नोंदवण्यास त्यांनी सहमती दर्शवली आहे. दरम्यान, सोरेन रांचीला परतणार आहेत का असे विचारले असता सिंह यांनी काहीच उत्तर दिले नाही.

दरम्यान, झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी म्हटले आहे, "तुमच्याप्रमाणेच (मीडिया) आम्हीही मुख्यमंत्र्यांची वाट पाहत आहोत. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. आम्हाला घटनेला धरुन काम करायचे आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे."

शासकीय निवासस्थान, राजभवन परिसरात १४४ लागू

सोरेन यांचे शासकीय निवासस्थान, राजभवन आणि रांची येथील ईडी कार्यालयाच्या १०० मीटरच्या क्षेत्रात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

सोमवारी रात्री उशिरापर्यंत जेएमएमचे आमदार सोरेन यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी थांबले होते. कथित जमीन फसवणुकीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात ईडीच्या पथकाने त्यांची चौकशी करण्यासाठी तेथे भेट दिली होती.

ईडीकडून चौकशीसाठी दहावे समन्स

या प्रकरणी ईडीने २० जानेवारी रोजी सोरेन यांची रांची येथील शासकीय निवासस्थानी चौकशी केली होती आणि त्यांना दहावे समन्स जारी केले आहे. त्यांना २९ जानेवारी अथवा ३१ जानेवारी रोजी चौकशीसाठी उपलब्ध आहात का? अशी विचारणा करण्यात आली होती. आतापर्यंत, सोरेन यांनी ईडीचे नऊ समन्सना टाळाटाळ केली आहे.

२७ जानेवारीच्या रात्री रांचीहून दिल्लीला रवाना झालेल्या सोरेन यांनी ईडीला एक ईमेल पाठवला होता ज्यामध्ये त्यांनी ३१ जानेवारी रोजी दुपारी १ च्या सुमारास त्यांच्या रांचीतील निवासस्थानी नव्याने चौकशीसाठी सहमती दर्शवली आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चाने सोरेन यांच्या विरुद्धची ईडीची कारवाई "असंवैधानिक" असल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT