दुबई; पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानने श्रीलंकेला (Asia Cup 2022) अवघ्या १०५ धावांत रोखल्यानंतर अवघ्या १०.१ षटकातच २ बाद १०६ धावांचा अफगाणिस्तानने यशस्वी पाठलाग केला. सलामीवीर हजरतुल्ला जझाई आणि रहमतुल्ला गुरबाझ यांच्या धडाकेबाज फलंदाजीने पुन्हा श्रीलंकन गोलंदाजीचा अक्षरशा: खुर्दा केला. जझाई अखेर पर्यंत नाबाद रहात ३८ धावा केल्या. तर रहमतुल्ला याने १८ चेंडूत ४० धावांची वादळी खेळी केली. अखेर अकराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर विजयी धाव घेत श्रीलंकेला आठ गडी राखून पराभूत केले.
श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यास उतरलेल्या अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांची तमा न बाळगता धो-धो धुलाई केली. दोन्ही सलामीवीरांनी मिळून पावर प्लेच्या सहा षटकात नाबाद ८३ धावा धावफलकावर नोंदवल्या. त्यानंतर गोलंदाज हसरंगाने गुरबाजला बोल्ड केले. गुरुबाजने तब्बल १८ चेंडूत ४० धावा पटकावल्या. या तुफानी खेळीत त्याने तब्बल ४ षटकार आणि ३ चौकारांची आतषबाजी केली. त्यानंतर आलेल्या इब्राहिम जारदान याला सोबत घेत हजरतुल्ला जझाईने श्रीलंके विरुद्ध फटकेबाजी सुरुच ठेवली. दहाव्या षटकातील इब्राहिम जारदान हा धावबाद झाला. त्याने १३ चेंडूत १५ धावांची खेळी केली. अखेर नाबाद रहात जझाईने अकराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर सामना संपवला. जझाईने नाबाद ३७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार आणि ५ चौकार लगावले. नजिबुल्ला जारदान हा २ धावा करुन नाबाद राहिला. अशा प्रकारे दुबळ्या अफगाणिस्तानने श्रीलंकेला धोबीपछाड दिला.
फलंदाजी प्रमाणे अफगाणिस्तानच्या फलंदाजांसमोर श्रीलंकेची गोलंदाजी देखिल निष्प्रभ ठरली. हसरंगा वगळता कोणाला ही बळी मिळण्यात यश आले नाही. हसरंगा याने तीन षटकात १९ धावा देत १ बळी मिळविला. पहिला षटक टाकणारा श्रीलंकेचा जलद गती गोलंदाज दिलशान मधुशनाका याने पहिल्या षटकात १० धावा दिल्या. यामध्ये त्याने तब्बल ५ वाईड चेंडू टाकले. यानंतर त्याला गोलंदाजीच देण्यात आली नाही. दुसरा महत्त्वाचा गोलंदाज महिश थिक्शना याने ४ षटकात ३५ धावा दिल्या. बाकी गोलंदाजांचा देखिल अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी चांगलाच खरफूस समाचार घेतला.
तत्पुर्वी, दुबई येथे आशिया कप २०२२ च्या टी २० क्रिकेट स्पर्धेत दिमाखात सुरुवात झाली. पहिल्या श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तानच्या सामन्यात दुबळ्या अफगाणिस्ताने श्रीलंकन संघास अवघ्या १०५ धावात गुंडाळले.
नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अफगाणिस्तानच्या चागलाच पारड्यात पडला. अफगाणिस्तानचा जलदगती गोलंदाज फझलहक फारुकी याने स्वप्नवत सुरुवात करत पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर कुशल मेंडिस याला दोन धावांवर पायचीत केले. तर त्यानंतर आलेल्या चरिथ असलंका याला सलग दुसऱ्या चेंडूवर शुन्यावर पायचित केले. अशा प्रकारे त्याने पहिल्याच षटकात अफगाणिस्तानला दोन महत्त्वपुर्ण बळी मिळवून दिले.
पहिल्याच षटकात धक्का बसल्याने अखेर पर्यंत श्रीलंका या धक्क्यातून सावरु शकला नाही. यानंतर दुसऱ्याच षटकात गोलंदाज गुरबाझ याने निसांका याला पाठीमागे किपरकडे झेल देण्यास भाग पाडून बाद केले. निसांका याने ७ चेंडूत ३ धावा केल्या. अशा प्रकारे अवघ्या पाच धावांवर श्रीलंकेने पहिले तीन फलंदाज गमावले आहे. यानंतर धनुष्का गुनथिलका आणि भानुका राजपाक्षे यांनी श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, आठव्या षटकात गुनथिलकाने गोलंदाज मुजीब याच्या गोलंदाजीवर करीमकडे झेल देऊन बाद झाला. गुनथिलकाने १७ चेंडूत १७ धावांची खेळी केली. यानंतर आलेला हसरंगा देखिल येताच क्षणी मोठेफटके मारण्याचा नादात पुन्हा मुजीबच्या गोलंदाजीवर झेल देऊन बाद झाला. त्याने ८ चेंडूत २ धावा केल्या. आता श्रीलंकेची अवस्था १० षटकातमध्ये ६० धावांवर ५ बाद अशी झाली होती. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी पुन्हा श्रीलंकन फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही व ठराविक अंतरावर विकेट घेत राहिले.
श्रीलंकेकडून एकट्या भानुका राजेपाक्षे हाच श्रीलंकेसाठी चांगला खेळण्याचा प्रयत्न केला. हसरंगा बाद झाल्यावर शनाका देखिल त्याच्या मागोमाग माघारी परतला त्याला खातेसुद्धा उघडता आले नाही. त्याला देखिल नजीबनेच बाद केले. यानंतर तेराव्या षटकात धाव घेण्याच्या प्रयत्नात चांगला जम बसेलेला राजेपाक्षे हा धावबाद झाला. त्याने २८ चेंडूत ३८ धावात महत्त्वपूर्ण खेळी केली. यानंतर पुढच्याच चेंडूवर पुन्हा मैदानात उतरलेला महिश थिक्शना हा सुद्धा धाव बाद झाला. त्या सुद्धा भोपळा पोडता आला नाही. पुढे पंधराव्या षटकात नबीने मथीशा पथिराना याला अवघ्या पाच धावांवर बाद केले.
अखेरच्या षटकात चमिका करुनारत्ने अखेरच्या दिलशान मधुशनाका याला सोबत घेऊन काही धावा जोडण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ३० धावा श्रीलंकेच्या धावसंख्येत जोडल्या. अखेरच्या षटकात गोलंदाज फझलहक फारुकी याने करुनारत्नेला बोल्ड करत श्रीलंकेचा डाव संपवला. चमिका करुनारत्ने याने ३८ चेंडूत ३१ धावांची जबाबदारपुर्ण खेळी केली.
अफगाणिस्तान कडून गोलंदाज फझलहक फारुकी याने ११ धावा देत तीन महत्त्वाचे बळी घेतले. या व्यतीरिक्त मुजीब व कर्णधार नबी याने २ – २ बळी घेतले. नवीन उल हक याला एक बळी घेतला आला. पण, अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खानला मात्र एकसुद्धा बळी मिळवता आला नाही.