अफगाणिस्तानातील सामान्य जनतेला दोनवेळचे जेवण मिळणे आजही कठीण. 2000 साली तालिबानने क्रिकेटला मान्यता दिली आणि त्यानंतर 2013 साली संघाला 'आयसीसी'कडून सहयोगी सदस्यत्व मिळाले. 2011 मधील विश्वचषक स्पर्धेसाठी हा संघ पात्र होऊ शकला नाही. अखेर 2015 मध्ये संधी मिळाली. तेव्हापासून या संघाची वाटचाल आजतागायत सुरू आहे.
फाटलेले बूट, ओसाड शेतजमीन, गणवेशाचा पत्ता नाही, आसपास धडाडणार्या तोफा, कधीच कापडाचा, तर कधी टेनिसचा चेंडू… तरीही याची कसलीच तमा न बाळगता अफगाणिस्तानचे क्रिकेट फुलत गेेले. यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तर या संघाने कमाल केली. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर विश्वविजेत्या इंग्लंडला 69 धावांनी लोळवल्यानंतर त्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. त्या सामन्यात इंग्लंडचा संघ एवढा लाजिरवाणा पराभव पत्करेल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. अर्थात, लगेचच त्यांचे विमान न्यूझीलंडने जमिनीवर आणले, हे खरे आहे. याचदरम्यान नेदरलँड म्हणजेच हॉलंडने दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या संघाला दणका दिला. हाही विजय अनपेक्षित. एरव्ही दक्षिण आफ्रिकेचा संघ चोकर्स (अवसानघातकी) म्हणून प्रसिद्धच आहे. नेदरलँडविरुद्धच्या लढतीत पुन्हा त्यांच्याकडून असाच नवा अध्याय पाहायला मिळाला. असो. या लेखात आपल्याला चर्चा करायची आहे ती जिगरबाज अफगाणिस्तान संघाची.
इतिहासावर नजर टाकायची, तर 1839 मध्ये अफगाण भूमीवर काही ब्रिटिश सैनिकांनी सर्वप्रथम क्रिकेटचे काही सामने खेळले होते. त्यामुळे या खेळाची ओळख तिथल्या जनतेला झाली. नंतरच्या काळात फारसे काही घडले नाही. तत्कालीन सोव्हिएत महासंघाने (आताचा रशिया) अफगाण भूमीवर आक्रमण केले. 1990 च्या दशकातील तो काळ शीतयुद्धाचा होता. त्यामुळे अफगाणी खेळाडूंना पाकिस्तानात प्रामुख्याने जलालाबाद परिसरातील निवासी छावण्यांमध्ये कशीबशी गुजराण करावी लागली. यातील बहुतांश खेळाडूंची कुटुंबे तेव्हा कोंबड्या पाळत असत. यावरून अफगाणी खेळाडूंना चिकन टीम या नावाने हिणवले जायचे.
स्थानिकांकडून सतत टोमणेही ऐकायला लागायचे. त्याला इलाज नव्हता. कारण, अफगाणिस्तानमध्ये तेव्हा युद्धमय परिस्थिती होती. एवढेच नव्हे, तर सीमेला लागून असलेल्या पट्ट्यात पाकिस्तानने चौक्या उभारल्या होत्या, तिथेही कधी एखादे क्षेपणास्त्र किंवा बॉम्ब येऊन कोसळेल, याचा नेम नव्हता. मात्र, अफगाणी खेळाडूंनी तशा वातावरणातही आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याचे स्वप्न पाहिले. या स्वप्नाला धुमारे फुटायला सुरुवात झाली ती 1995 मध्ये. यादरम्यान अफगाणिस्तानच्या क्रिकेट मंडळाची स्थापना झाली. मात्र, पैशांची वानवा असल्यामुळे या मंडळाचा कारभार कागदावरच होता. पैसा नाही म्हणून सुविधा नाहीत आणि सुविधा नाहीत म्हणून विकासाची दारे बंद. अफगाणिस्तानमध्ये आजच्या घडीला एकही क्रिकेट स्टेडियम नाही. त्यामुळे एखादी स्पर्धा आयोजित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
टान्झानिया, केनिया, थायलंड, युगांडा यासारख्या छोट्या देशांनीही विविध क्रिकेट स्पर्धांचे आयोजन आतापर्यंत केले आहे. मात्र, अफगाणिस्तानात हे केव्हा घडेल, याबद्दल आताच काहीही सांगता येणार नाही. काबूल, कंदाहर या ठिकाणी स्टेडियम्स उभारण्याचे काम प्रगतिपथावर असून, सध्याच्या घडीला जवळपास तीनशे क्रिकेट अकादमी या देशात कार्यरत आहेत. करीम सादिक हे यातील तगडे नाव. त्यांचा सगळा उमेदीचा काळ पाकिस्तानातील निर्वासितांच्या छावण्यात गेला. आता ते अफगाणिस्तानात परत गेले असून, नांगरहार नावाची क्रिकेट अकादमी ते चालवत आहेत. रोज सुमारे तीनशे मुले त्यांच्या अकादमीत क्रिकेटचे धडे गिरवत आहेत. आता हेच युवा खेळाडू पाकिस्तान क्रिकेट लीगमध्येच नव्हे, तर आयपीएलमध्येही मर्दुमकी गाजवण्याची मनीषा बाळगून आहेत.
सध्या अफगाणिस्तान क्रिकेट संघात खेळणारा आफताब आलम हा करीम यांचा धाकटा भाऊ. खरे तर 35 वर्षीय करीम हेही काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. मात्र, त्यांची कारकीर्द बहरली नाही. आता त्यांनी स्टार होण्याचे स्वप्न बाळगलेल्या अनेक अफगाण मुलांना आपल्या पंखाखाली घेतले आहे. यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचा एखादा जगप्रसिद्ध खेळाडू समोर येईल, अशी आशा ते बाळगून आहेत. आजही त्यांना भारतीय आयपीएलने भुरळ घातली आहे. अफगाणिस्तानातील क्रिकेटला आलेल्या मर्यादांचे मुख्य कारण आहे ते तेथील तालिबानी राजवट. या राजवटीला जागतिक पातळीवर मान्यता मिळालेली नाही. ना कसले उद्योग, ना कसदार शेती. शेती केली जाते ती फक्त अफूची. त्याच्या काळ्या बाजारातून मिळणार्या पैशांवर तेथील मूठभर नेते गब्बर झाले आहेत. बाकी सगळा अंधार. दोनवेळचे जेवण मिळणे आजही अफगाणिस्तानातील सामान्य जनतेला मिळणे कठीण. गरिबी पाचवीला पूजलेली. अखेर 2000 साली तालिबानने क्रिकेटला मान्यता दिली आणि त्यानंतर 2013 साली या संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून सहयोगी सदस्य म्हणून मान्यता मिळाली. 2011 मधील विश्वचषक स्पर्धेसाठी हा संघ पात्र होऊ शकला नाही. अखेर 2015 मध्ये त्यांना ही संधी मिळाली. सुरुवातीच्या दोन सामन्यांत हार स्वीकारल्यानंतर त्यांनी स्कॉटलंडला लोळवून पहिल्या विजयाची न्यारी चव चाखली. तेव्हापासून या संघाची वाटचाल आजतागायत सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नेबर फर्स्ट' या धोरणानुसार अफगाणिस्तापुढे नेहमीच सहकार्याचा हात पुढे केला आहे. तो कित्ता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच 'बीसीसीआय'नेही गिरवला आहे. अफगाणिस्तानात क्रिकेट बहरण्यासाठी 'बीसीसीआय'ने अनेकदा पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच तेथील क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शफीक स्टानिकजई यांनी भारताचे हे ऋण नेहमीच मान्य केले आहेत. लखनौमधील अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय स्टेडियम म्हणजे जणू अफगाणिस्तानचे नवे घरच. डेहराडून आणि ग्रेटर नोएडा येथेही अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाला विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
2017 मध्ये आयर्लंडपाठोपाठ अफगाणिस्तानला कसोटी संघाचा दर्जा बहाल करण्यात आला. जून 2018 मध्ये बंगळूर येथे झालेल्या एकमेव कसोटीत टीम इंडियाने केवळ दोनच दिवसांत अफगाणिस्तानला एक डाव आणि 262 धावांनी आस्मान दाखवले होते. विश्वचषकात आतापर्यंत या संघाने अठरा सामने खेळले असून, त्यातील दोन लढतींत त्यांनी विजयाला गवसणी घातली आहे.
ताज मलिक यांना अफगाणिस्तानच्या क्रिकेटचे जनक मानले जाते. गुणी मुलांचा शोध घेत त्यांची भटकंती निर्वासितांच्या छावण्यांत सुरू असायची. मात्र, त्यांच्या वाट्याला अनेकदा अवहेलना आणि पाणउतारा यायचा. त्याकाळी आमच्याकडे 11 खेळाडूही नसत म्हणून आम्ही मुलांना बळजबरी बोलवायचो. क्रिकेट खेळणार्या अफगाणी मुलांचे वडील येऊन मला धमकवायचे. म्हणायचे, क्रिकेटमध्ये पोरांचा वेळ वाया जातो. मी या मुलांना म्हणत असे, आपण काबूलला परत जाऊ, क्रिकेटचा संघ बांधू. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू; पण कुणी ऐकत नव्हते. 1995 साल उजाडता उजाडता मलिक यांनी आपल्या अफगाण क्रिकेट क्लबचे अफगाण क्रिकेट फेडरेशनमध्ये रूपांतर केले आणि देशाच्या ऑलिम्पिक कमिटीला आपल्या संस्थेची दखल घ्यायला भाग पाडले. तालिबानने फुटबॉलवर बंदी घातली. मात्र, क्रिकेटला त्यांचा विरोध नव्हता. तालिबानमधील काहींना क्रिकेट एवढे आवडू लागले की, तेसुद्धा आवडीने क्रिकेटचे सामने पाहू लागले.
यात भारताने आपला वाटा उचलताना कंदाहरमध्ये बांधण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी दहा कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. त्याचबरोबर हेही खरे की, आता पाकिस्तानही आर्थिक मदतीसह अफगाण खेळाडूंना प्रशिक्षण देत आहे. यामुळेच नवनव्या खेळाडूंची खाण तेथे उदयाला येऊ लागली आहे. यातील काही नावे आवर्जून दखल घ्यावी अशी आहेत. अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजाद याने वन-डे क्रिकेटमध्ये 2,727 धावा झोडल्या आहेत. यात सर्वांचा लाडका खेळाडू म्हणजे राशिद खान. आयपीएलमध्ये तो सातत्याने धुमाकूळ घालत आहे. वन-डेमध्ये त्याने 178 बळी मिळवले आहेत. त्याच्या जोडीला मोहम्मद नबी हाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकतोय. त्याने 156 जणांना तंबूचा रस्ता दाखवला आहे.
रहमत शाह याने 3,342 धावा कुटल्या असून, त्याची धावांची भूक वाढतच चालली आहे. ही यादी आणखी वाढत चालली आहे. वेस्ट इंडिजचा माजी कसोटीपटू फिल सिमन्स याने अफगाणिस्तानच्या संघाची पायाभरणी केली अन् त्यावर कळस चढवला तो जोनाथन ट्रॉट या माजी ब्रिटिश कसोटीपटूने. त्याने 2009 साली पदार्पणातच अॅशेस मालिकेत जबरदस्त शतक ठोकले. मात्र, तब्येतीने त्याला दगा दिला. आपल्याला मानसिक आजार असल्याची घोषणा जेव्हा त्याने केली तेव्हा मोठीच खळबळ माजली. आपल्या करिअरची पर्वा न करता 2013 मध्ये क्रिकेटपासून फारकत घेऊन त्याने स्वतःवर उपचार करवून घेतले. आपल्याला आता सूर सापडणे कठीण असल्याचे त्याला कळून चुकले. यानंतर 2018 मध्ये त्याने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि जुलै 2022 मध्ये अफगाणिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. येथूनच अफगाण संघाचे सुगीचे दिवस सुरू झाले. खरे तर भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि नेपाळ या संघांविरुद्ध अजून अफगाणिस्तानला यश मिळवता आलेले नाही. तथापि, युवा खेळाडूंची खाण तेथे उदयाला येऊ लागल्यामुळे नजीकच्या भविष्यात हा संघ प्रस्थापितांत गणला जाईल, यात शंका नाही.
'अमूल'कडून स्पॉन्सरशिप
शरिया कायद्यावर विश्वास ठेवणार्या तालिबानी राजवटीचा आधुनिकतेला विरोध असला, तरी क्रिकेटला पाठिंबा आहे. मात्र, आमच्याकडे तुमच्यासाठी पैसे नाहीत, तुम्ही स्वबळावर क्रिकेटचे काय ते बघा, असे तालिबानकडून अफगाणिस्तानच्या क्रिकेट मंडळाला बजावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातच्या 'अमूल' या दुग्धोत्पादनात अग्रेसर असलेल्या संस्थेने अफगाणिस्तानच्या क्रिकेटला मोठा आधार दिला आहे. खरे तर 'अमूल'कडून वार्षिक दोनशे कोटी रुपयांच्या विविध पदार्थांची निर्यात अफगाणिस्तानला केली जाते. ही रक्कम नामांकित संघांना मोजाव्या लागणार्या रकमेच्या तुलनेत अगदीच किरकोळ आहे. तरीदेखील 'अमूल'ने या उपेक्षित; पण गुणवंत चमूला स्पॉन्सर करून मोठेच धाडस दाखवले, यात शंका नाही.