Latest

Aero India Show 2023 : ‘मेक इन इंडिया’, 15 लढाऊ विमाने, DRDO ची धोकादायक UAV… एरो इंडिया शोमध्ये काय खास आहे?

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Aero India Show 2023 : एरो इंडियाच्या 14व्या आवृत्तीला सोमवारपासून सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे उद्घाटन केले. शोचे उद्घाटन करताना पीएम मोदी म्हणाले की, आज एरो इंडिया हा केवळ शो नाही तर ती भारताची ताकद आहे.

मोदी म्हणाले, एरो इंडियाच्या या कार्यक्रमातून आजच्या भारताचा दृष्टिकोनही प्रदर्शित करतो. एक काळ असा होता जेव्हा हा फक्त 'शो' किंवा 'भारतासाठी विक्रीची' खिडकी मानले जात होते, परंतु गेल्या काही वर्षांत देशाने हा दृष्टिकोन बदलला आहे.

पाच दिवस चालणाऱ्या एरो इंडियाचे आयोजन बंगळूर येथील येलाहंका एअरफोर्स स्टेशनवर होत आहे. हा संपूर्ण परिसर 35 हजार चौरस मीटरमध्ये पसरलेला आहे. या शोमध्ये 98 देशांतील 100 हून अधिक संरक्षण कंपन्या सहभागी झाल्या आहेत. 700 पेक्षा जास्त कंपन्या फक्त भारतातील आहेत. या शोमध्ये 32 देशांचे संरक्षण मंत्री आणि 29 देशांचे हवाई दल प्रमुख देखील सहभागी होणार आहेत.

हा कार्यक्रम 13 ते 17 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यातील 13 ते 15 फेब्रुवारी हे दिवस सोडून 16 आणि 17 तारखेला हा कार्यक्रम सर्वसामान्यांसाठी खुला असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

डीआरडीओच्या शिबिरात काय खास आहे?

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) अनेक शस्त्रे तयार केली आहेत. यातील सर्वात खास UAV म्हणजे TAPAS-BH. त्याचे पूर्ण नाव टॅक्टिकल एरियल प्लॅटफॉर्म फॉर अॅडव्हान्स्ड सर्व्हिलन्स – बियॉन्ड होरायझन असे आहे.

एरो इंडियामध्ये (Aero India Show 2023) TAPAS-BH प्रथमच उड्डाण करणार आहे. डीआरडीओच्या म्हणण्यानुसार, तिन्ही सेना त्याचा वापर करू शकतील. हे ड्रोन 28 हजार फूट उंचीवर 18 तासांपेक्षा जास्त काळ उड्डाण करण्यास सक्षम आहे. एवढेच नाही तर TAPAS-BH वरून एका वेळी 350 किलो वजनाची स्फोटके (पेलोड) पाठवले जाऊ शकतात.

'मेक इन इंडिया'तील 15 लढाऊ विमाने भराणार उड्डाण

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) एरो इंडिया शोमध्ये 15 मेक इन इंडिया लढाऊ विमाने प्रदर्शित करेल. त्यात अॅडव्हान्स्ड लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) 'प्रचंड' आणि लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) यांचाही समावेश आहे. तसेच भारतीय मल्टी रोल हेलिकॉप्टर, नेक्स्ट जनरेशनचे मॉडेल HLFT-42 आणि LCA Mk 2, हिंदुस्तान टर्बो-शाफ्ट इंजिन-1200, RUAV, LCA ट्रेनर आणि हिंदुस्थान- 228 हे देखील एचएएलमध्ये आकर्षणाचे विषय आहेत.

'प्रचंड' हे बहुभूमिका आणि छोटे लढाऊ हेलिकॉप्टर आहे. यामध्ये अनेक धोकादायक शस्त्रे तैनात केली जाऊ शकतात. चिन-माउंटेड गन, 68 मिमी रॉकेट, बॉम्ब, हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे यामध्ये तैनात केली जाऊ शकतात. त्याच वेळी, लाइट यूटिलिटी हेलिकॉप्टर ताशी 220 किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकते. यामध्ये एकावेळी 500 किलो वजनाचा पेलोड वाहून नेला जाऊ शकतो.

आणखी काय विशेष असेल?

एरो इंडिया शोमध्ये (Aero India Show 2023) अनेक परदेशी कंपन्याही आपली ताकद दाखवणार आहेत. या शोमध्ये राफेलचेही उड्डण होणार आहे. भारताकडे 36 राफेल लढाऊ विमाने आहेत. ती फ्रान्सकडून विकत घेतली आहेत. त्याची निर्मिती Dassault Aviation या कंपनीने केली आहे.

याशिवाय अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिनचे F-35 विमानही यात उड्डाण करणार आहे. हे सिंगल सीटर, सिंगल इंजिन मल्टी रोल फायटर विमान आहे. यातून अनेक धोकादायक क्षेपणास्त्रे सोडली जाऊ शकतात. यासोबतच F-16 देखील उड्डाण करेल, जे अमेरिकन कंपनी जनरल डायनॅमिक्सने बनवले आहे. हे सिंगल इंजिन मल्टीरोल लढाऊ विमान आहे.

एचएएलने बनवलेले Harvard Trainer-291 (HT-291) विमानही या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. हे भारतीय हवाई दलाचे विनटेन विमान आहे, ज्याने 1989 मध्ये शेवटचे उड्डाण घेतले होते. त्याची निर्मिती 1943 मध्ये झाली आणि 1947 मध्ये हवाई दलात समाविष्ट करण्यात आले होते.

या सर्वांशिवाय अमेरिकन कंपनी बोईंगने बनवलेले Apache AH-64 (E) देखील एरो इंडिया शोमध्ये आपली क्षमता दाखवेल. 2019 मध्ये ते भारतीय हवाई दलात सामील झाले. हे जगातील सर्वात धोकादायक अटॅक हेलिकॉप्टरपैकी एक आहे.

एरो शो व्यतिरिक्त काय होणार?

या शोमध्ये 32 देशांचे संरक्षण मंत्री सहभागी होत आहेत. 14 फेब्रुवारीला संरक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे. याशिवाय 26 देशांच्या संरक्षण कंपन्यांच्या सीईओंची गोलमेज बैठकचेही आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोईंग, लॉकहीड मार्टिन, इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज, जनरल अॅटॉमिक्स, रेथिऑन टेक्नॉलॉजी, सफारान आणि जनरल अथॉरिटी ऑफ मिलिटरी इंडस्ट्रीज या विदेशी कंपन्यांचे सीईओ तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि मिश्रधातु निगम लिमिटेड या देशांतर्गत कंपन्यांचे सीईओ या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय या एरो इंडिया शोमध्ये हजारो कोटींचे संरक्षण करारही होण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतीय आणि विदेशी संरक्षण कंपन्यांमध्ये 75 हजार कोटी रुपयांचे 250 हून अधिक करार होणे अपेक्षित आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT