Latest

सहा वर्षे पूर्ण असतील तरच पहिलीत प्रवेश

Arun Patil

नानीबाई चिखली : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून इयत्ता पहिलीत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्याचे वय निश्चित करण्यात आले असून देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. नवीन शैक्षणिक सत्र 2024-25 पासून इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलाचे वय किमान 6 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

देशातील शिक्षण क्षेत्रात बदल घडविण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले असून त्याची संपूर्ण देशात अंमलबजावणी सुरू आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशाची वयोमर्यादा बदलण्यात आली आहे.

पहिलीच्या प्रवेशासाठी 6 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याचे निर्देश केंद्रीय शिक्षण विभागाने राज्यांच्या शिक्षण विभागाला दिले असून ही वयोमर्यादा एनईपी 2020 अंतर्गत प्रस्तावित आहे.

विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास लक्षात घेऊन पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी हा नियम नवीन शैक्षणिक धोरणानुसार केला जाणार आहे. शाळा विशेष करून खासगी शाळा व पालक बर्‍याच वेळा मुले वर्गात बसण्यासाठी तयार आहेत की नाही याचा विचार न करता नर्सरी, केजी, प्री-प्रायमरीत घालतात. अशा शाळांनादेखील येत्या जूनपासून शिक्षण विभागाच्या अंतर्गत आणले जाणार असून त्यांनाही नियमाचे पालन करावे लागणार आहे.

बालकांना मिळणार बालपणाचा आनंद

शासनाच्या या निर्णयामुळे आता सहा वर्षांपेक्षा कमी वय असणार्‍या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार नाही. याआधी खासगी शाळांमध्ये कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा. यामुळे विद्यार्थ्यांवर कमी वयात अभ्यासाचा भार पडायचा. यामुळे अनेकांना बालपण अनुभवायला मिळत नव्हते. तसेच विद्यार्थ्यांच्या मेंदूच्या विकासावरही परिणाम व्हायचा. ते आता थांबणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT