मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सरकार तोडमोड करून बनलेले आहे. महाराष्ट्रापेक्षा त्यांना गुजरातचीच काळजी लागली आहे. विविध प्रकल्पांनंतर आता हिरे व्यापारी आपला व्यवसाय सुरतला हलवत आहेत. हे सगळे बुलेट ट्रेन येण्याआधी झाले आहे. आता बुलेट ट्रेन आल्यावर या सरकारला मंत्रालयसुद्धा गुजरातला हलवावे वाटेल, अशी टीका शिवसेना नेते, आ. आदित्य ठाकरे यांनी केली.
आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी डिलाईल रोड पुलाची पाहणी केली. या पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना ठाकरे म्हणाले की, 10 नोव्हेंबरपर्यंत पुलाची दुसरी बाजू सुरू होईल. या पुलासाठी जशी दिरंगाई झाली तशीच दिरंगाई गोखले पुलाबाबत सुरू आहे. तिथेही रेल्वेकडून हतबलता दाखविली जात आहे. त्यामुळे गोखले पुलाचे कामही वेळेत पूर्ण होऊ शकणार नसल्याची आमची माहिती आहे, असे ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मुंबईतील प्रदूषणावरून भाजप नेते आशिष शेलार यांच्या टीकेवर आदित्य ठाकरे म्हणाले की, जे बीसीसीआयमध्ये बसून मुंबईतील फायनल मॅच गुजरातला नेऊ शकतात ते यावर उत्तर देण्याच्या लायकीचे आहेत असे मला वाटत नाही. नैराश्यात असलेल्यांना, उपचारांची गरज असलेल्यांना मी उत्तर देत नाही. ज्यांना त्यांच्या पक्षात किंमत नाही त्यांना मी उत्तर देत नाही, असेही ते म्हणाले.