नवी दिल्ली/बंगळूर; पीटीआय : 'चांद्रयान-3' च्या ऐतिहासिक यशानंतर सूर्याभोवतीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या वतीने 2 सप्टेंबर रोजी सूर्यमोहीम सुरू करण्यात येणार आहे.
'आदित्य-एल 1' या अवकाश यानाद्वारे सूर्याभोवतीच्या तेजोमंडळ आणि प्रभामंडलाचे निरीक्षण करण्यात येणार आहे. यामुळे खगोलशास्त्रज्ञांना ग्रह-तार्यांवर होणार्या परिणामांचा अभ्यास करण्यास मदत होणार आहे. सूर्यमोहिमेबाबत माहिती देताना इस्रोने सांगितले की, या यानावरील 7 पेलोडस्द्वारे सूर्याभोवतीच्या वातावरणाचे निरीक्षण करण्यात येणार आहे. 4 पेलोडस् थेट सूर्याचे, तर 3 पेलोडस् सूर्यकिरणांचे निरीक्षण करणार आहेत.
यूव्ही पेलोड आणि एक्स-रे पेलोडद्वारे सूर्याभोवतीच्या वातावरणाचे निरीक्षण केले जाणार आहे. विद्युतचुंबकीय लहरी, प्रभारित विद्युतकण आदींचीही माहिती मिळणार आहे. बंगळूरमधील इस्रोच्या मुख्यालयातून या यानाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पृथ्वीपासून 15 लाख कि.मी. (1.5 दशलक्ष कि.मी.) अंतरावरील कक्षेत 'आदित्य-एल 1' अवकाश यान स्थिरावणार आहे. हे यान पोहोचण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तिथे पोचल्यानंतर ते सूर्याभोवतीच्या वातावरणाचे सूक्ष्म निरीक्षण करणार आहे. सूर्याभोवतीचे तापमान, सौरलहरी, सूर्यकण, सूर्यकिरणे, वातावरणातील तापमानाचे प्रमाण, घनता, विद्युतचुंबकीय लहरी आदींचा अभ्यास करण्यात येणार आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंग यांनी यांनी गगनयानाच्या संभाव्य कार्यक्रमाची माहिती शनिवारी जाहीर केली.
गगनयान मोहिमेसाठी हुबेहूब महिलेसारखी दिसणार्या रोबोची निर्मिती करण्यात आली आहे. तिचे नावे 'व्योमित्रा' असे ठेवण्यात आले आहे. 22 जानेवारी 2020 रोजी या महिला रोबोची निर्मिती करण्यात आली आहे. मानवयुक्त गगनयान मोहिमेदरम्यान, महिला रोबो अवकाशवीरांना मदत करेल. सूर्यमोहिमेच्या दुसर्या टप्प्यातील मोहिमेदरम्यान अवकाशयानातून या महिला रोबोला पाठविण्यात येणार आहे.
'आदित्य-एल 1' या सूर्यमोहिमेसाठी मेक इन इंडियाअंतर्गत स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. बंगळूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट अॅस्ट्रोफिजिक्स (आयआयए) या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेसाठी लागणारे तंत्रज्ञान बनविण्यात आले आहे. आयआयएमधील खगोलशास्त्रज्ञ ग्रह-तार्यांच्या अभ्यासासाठी विशेष मोहिमांवर काम करतात. सूर्याभोवतीच्या तेजोमंडळातून होणार्या किरणोत्सर्गाचे निरीक्षण करण्यासाठी या संस्थेद्वारे पेलोडस्ची निर्मिती करण्यात येते. पुणेस्थित सेंटर ऑफ अॅस्ट्रॉनॉमी आणि अॅस्ट्रोफिजिक्स या संस्थेचाही या मोहिमेत सहभाग असणार आहे. सूर्यकिरणांचा त्वचेवर होणार्या परिणामांचा अभ्यास करणार्या पेलोडस्ची निर्मिती या ठिकाणी केली जाते.