पुढारी ऑनलाईन: चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि लहान भाऊ शंकर जगताप या दोघांनी भाजपकडून पोटनिवडणुकीसाठी अर्ज घेऊन भाजपच्या उमेदवारीवर दावा केला आहे. यानंतर जगताप कुटुंबात वाद आहेत अशी चर्चा होऊ लागली होती. आता या सर्व चर्चेवर लक्ष्मण जगतापांचा मुलगा आदित्य जगतापने फेसबुकवर पोस्ट करत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
आदित्य जगतापने आपल्या फेसबुकवर एक भावनिक पोस्ट केली आहे. आम्हाला जगातील कोणतीही शक्ती वेगळे करू शकत नाही, आम्ही शेवटपर्यंत एक आहोत, असा आशय या पोस्टमध्ये आहे. यासोबतच कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोटोही त्यांनी अपलोड केलेले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी आणि भाऊ शंकर यांच्यात उमेदवारीवरून वाद सुरु असल्याचे समोर आले होते. आमदार लक्ष्मण जगतापांच्या निधनाला एक महिना उलटत असतानाच कुटुंबातील वादाची चर्चा समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण जगताप यांचा मुलगा आदित्यने फेसबुकवर कुटुंबाच्या फोटोसह "जगातील कोणतीही शक्ती आम्हाला वेगळे करू शकत नाही, आम्ही शेवटपर्यंत एक आहोत." अशा आशयाची एक पोस्ट केली आहे. आदित्यच्या या भावनिक पोस्टनंतर या वादावर पडदा पडणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
चिंचवड आणि कसबा पेठ मतदार संघात अद्याप कोणत्याही प्रमुख पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. मात्र सर्व पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज विकत घेतला आहे. सर्वच पक्षात इच्छूकांची मोठी यादी आहे. त्यातही महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे.