West Bengal Lok Sabha Election 
Latest

West Bengal Lok Sabha Election : अधीररंजन चौधरी विरुद्ध युसूफ पठाण सामना रंगणार

अनुराधा कोरवी

बरहामपूर : विशेष प्रतिनिधी : पश्चिम बंगालच्या बरहामपूर मतदार संघात काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसने प्रसिद्ध क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना मैदानात उतरवल्यामुळे देशात ही लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे. बरहामपूर मतदार संघातून पाच वेळा खासदार राहिलेले अधीररंजन चौधरी यांना यंदा लोकसभेत जाण्यापासून युसूफ पठाण रोखू शकतील का, या प्रश्नाचे उत्तर निवडणूक निकालातूनच मिळणार आहे.

पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले अधीररंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेस सरकारच्या गुंडागर्दी व दडपशाहीविरुद्ध नेहमीच आवाज उठवला आहे. त्यामुळे अधिररंजन चौधरी यांना त्यांच्या मतदार संघातच व्यस्त ठेवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही राजकीय खेळी केली आहे. क्रिकेटचे मैदान गाजविणारे युसूफ पठाण यांना उमेदवारी जाहीर करताच तृणमूल काँग्रेसने एक्स या सोशल मीडियावरील आपल्या अधिकृत हँडलवर युसूफ पठाण यांच्या स्वागतासाठी बरहामपूरच्या जनतेने रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केल्याचे छायाचित्र टाकले होते. 'माँ, माटी और माणूष' ही तृणमूल काँग्रेसची वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी युसूफ पठाण मैदानात उतरले आहे, असेही तृणमूलने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

युसूफ पठाण यांच्या उमेदवारीमुळे अधीररंजन चौधरी यांची जागा धोक्यात आल्याचा प्रचार तृणमूल काँग्रेसने सुरू केला आहे. अधीररंजन चौधरी यांनी मात्र, आपल्याला कोणाचेही आव्हान नसल्याचे म्हटले आहे. युसूफ पठाण हा बाहेरील उमेदवार असल्याचा पलटवार काँग्रेसने केला होता. त्यावर युसूफ पठाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील असताना वाराणसीमधून निवडणूक लढवतात. मी बरहामपूरमधून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर लढलो तर कुणाला काय हरकत आहे, असे उत्तर युसूफ पठाण यांनी विरोधकांना दिले आहे.

मी पश्चिम बंगालचाच मुलगा असून, आता याठिकाणीच राहायला आलो आहे. या निवडणुकीत मी जोरदार टक्कर देईल, असा दावाही युसूफ पठाण यांनी केला आहे. युसूफ पठाण यांची उमेदवारी म्हणजे, भाजपचा मत विभाजनाचा डाव आहे, असा आरोप अधीररंजन चौधरी यांनी केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही मतदान केंद्रांवर ताबा मिळवून गोंधळ घातला होता. याही निवडणुकीत गुंडागर्दी आणि दहशतीच्या जोरावर तृणमूल काँग्रेस वातावरण बिघडवत असल्याचा आरोप अधीररंजन चौधरी यांनी केला आहे. या सर्व घडामोडींमुळे बरहामपूरच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT