Latest

Mahesh Kothare : अभिनेते महेश कोठारे यांना मातृशोक; ज्येष्ठ रंगकर्मी सरोज ऊर्फ जेनमा यांचे निधन

backup backup

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य-चित्रपट निर्मात्या सरोज ऊर्फ जेनमा कोठारे (वय ९३) यांचे आज सायंकाळी कांदिवली येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare), नातू प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) असा परिवार आहे. कांदिवली येथील स्मशानभूमीत रात्री सरोज कोठारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Mahesh Kothare's mother passed away)

जेनमा कोठारे (Jenma Kothare) यांचे मूळ नाव सरोज असं आहे. १९ जून १९३० ही त्यांची जन्मतारीख. जेनमा यांचे वडील माधवराव तळपदे हे बहुश्रुत व्यक्तिमत्त्व. त्यामुळेच जेनमा यांच्यावर लहानपणापासून चांगले संस्कार झाले. प्रायोगिक रंगभूमीच्या ओढीने जेनमा आणि महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे (Amber Kothare) यांची पहिल्यांदा भेट झाली. १९५२ मध्ये त्यांचा विवाह झाला. 'जेनमा' हे टोपण नाव त्यांना त्यांच्या मावस बहिणीने दिले होते. जेनमा आणि अंबर कोठारे यांनी कालांतराने 'आर्टिस्ट कंबाइन' (Artist Combine) नावाची नाट्यनिर्मिती संस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे ते विविध नाटके सादर करीत असत. 'लग्नाची बेडी', 'झोपी गेलेला जागा झाला' या नाटकात जेनमा आणि अंबर कोठारे यांनी एकत्र काम केले होते. (Mahesh Kothare's mother passed away)

महेश कोठारे यांच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणासाठी तसेच चित्रपटसृष्टीतील त्यांच्या प्रगतीसाठी जेनमा यांनी उत्तरोत्तर विशेष मेहनत घेतली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे सहा दशकांपूर्वी त्यांनी महेश यांचे शालेय शिक्षण सांभाळून त्यांना चित्रीकरणात सहभागी होऊ दिले होते. महेश कोठारे यांनी बालकलाकार म्हणून ज्या गाजलेल्या हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला, त्या चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान जेनमा महेशसोबत सतत असायच्या. कालांतराने महेश कोठारे यांनी निर्मिलेल्या प्रत्येक चित्रपटामध्ये पडद्यामागे राहून त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. महेश कोठारे यांनी चित्रनिर्मितीला सुरुवात केली ती 'धुमधडाका' चित्रपटापासून. या चित्रपटाची निर्मिती महेश कोठारे यांनी 'जेनमा फिल्म्स इंटरनॅशनल' (Jenma Films International) या बॅनरद्वारे केली होती. 'दे दणादण', 'धडाकेबाज', 'झपाटलेला', 'माझा छकुला' आदी यशस्वी चित्रपटांची निर्मिती या बॅनरतर्फे करण्यात आली. काही महिन्यांपूर्वीच महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचेदेखील निधन झाले होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT