घटनास्थळी जप्त केलेली बोट 
Latest

 इंदापूर : ‘उजनी’त अवैद्य वाळु उपसा करणाऱ्यांवर कारवाई

अमृता चौगुले

इंदापूर;  पुढारी वृत्तसेवा :  उजनी जलाशयात बेकायदेशीररीत्या वाळु उपसा करणाऱ्या वाळूचोरांवर महसूल विभाग आणि पोलिसांनी कारवाईचा बडगा सुरू केला आहे. सुगाव (इंदापूर) गावच्या हद्दीत दोन बोटीसह वाळू उपशास लागणारी यंत्रसामुग्री जवळपास 42 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सात जणांना अटक केली आहे. आरोपींकडून वाळू काढण्यासाठी वापरात येणाऱ्या
दोन यांत्रिक बोटी, दोन सक्शन बोटी, 24 ब्रास वाळू असा एकूण 42 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी दोन फिर्यादी दाखल झाल्या आहेत. एकूण नऊ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दोन प्रमुख स्थानिक आरोपी फरार आहेत. अटक केलेले सर्व आरोपी मूळचे झारखंड राज्यातील आहेत. मन्सुर रेहमान पलटु शेख (वय ४६ वर्षे, आश्रफ कालु शेख, वय २० वर्ष), रहिम ईस्राईल शेख (वय २९ वर्षे), महादेव व्यवहारे (सर्व रा. माळवाडी नं. २, इंदापूर), हैतुल अली अकुमुद्दीम शेख (वय ३२ वर्षे) असीम बबलु शेख वय २१ वर्षे), रेजाऊल अफजल शेख (वय २५ वर्षे), समजाद अजहर शेख (वय ४६ वर्षे, सर्व रा. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर), युवा फलफले (रा. गलांडवाडी नं. १ ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत.

महादेव व्यवहारे व युवा फलफले हे फरारी आहेत. पोलीस कर्मचारी विक्रम घळाप्पा जमादार व पोलीस कर्मचारी लक्ष्मण निळकंठ सुर्यवंशी यांनी त्यांच्या विरोधात फिर्यादी दिलेल्या आहेत. त्यानुसार आरोपींविरुद्ध भा.द.वि. कलम ४३९,३७९,३४ सह पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम ९,१५ सह सार्वजनि संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३, ४ सह गौण खनिज कायदा कलम ३ अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलीसांनी त्यांच्याकडून प्रत्येकी १५ लाख रुपये किमतीच्या दोन फायबर यांत्रिक बोटी, प्रत्येकी ५ लाख रुपये किंमतीच्या दोन सक्शन बोटी व २ लाख ४० हजार रुपये किमतीची २४ ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील आरोपी यांत्रिक बोटीद्वारे उजनी पाणलोट क्षेत्रातील सुगाव गावच्या नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन करत आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर शासकीय बोटीतून त्यांचा पाठलाग करत सुगावपासून दोन किलोमीटर अंतरावर त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT