Latest

दिलीप वळसे-पाटील : भोंगे उतरविण्याचा अजेंडा भाजपने राबविल्यास कारवाई

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता मशिदींवरील भोंगे उतरविण्यासारख्या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील वातावरण बिघडवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. भोंगे उतरविण्याचा अजेंडा भाजपने राबविल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिला.

भोंगे उतरविण्याच्या अजेंड्यातून समाजात धार्मिक तेढ निर्माण केली जाऊ शकते. त्यामुळे पोलिस यंत्रणेने डोळ्यात तेल घालून सतर्क राहावे व धार्मिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्यावी, असे आदेशही वळसे-पाटील यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना दिले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा त्यांनी मंगळवारी बैठकीत घेतला. बैठकीला पोलिस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्य ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर घेतलेल्या मेळाव्यात मशिदींवरील भोंगे बंद झाले नाही तर मशिदीसमोर भोंगे लावून हनुमानचालिसाचे पठण करण्याचे जाहीर केले असून मनसे या मुद्द्यावर आक्रमक होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर वळसे-पाटील यांनी पोलिसांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीनंतर गृहमंत्री वळसे- पाटील म्हणाले, भोंगे उतरवण्याचा भाजपचा अजेंडा आहे. हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अशाप्रकारची आंदोलने करून जनतेमध्ये अस्वस्थतेची भावना तयार केली जात आहे. मात्र महाराष्ट्रात तसे काही होईल असे वाटत नाही. पोलिस लक्ष ठेवून आहेत. कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. भाजपच्या या अजेंड्याची सुरुवात कर्नाटकातून झाली आहे.

अन्य राज्यांमध्येही हा अजेंडा भाजपने सुरू केला आहे, असेही वळसे-पाटील म्हणाले. राज्यात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आहे. राज्यातील पोलिस यंत्रणा आपापल्यापरीने लक्ष ठेवून आहेत. भविष्यात कायदा व सुव्यवस्था असाच ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनही दिलीप वळसे-पाटील यांनी केले.
सरकारला कोणताही धोका नाही

संजय राऊत यांना कोणतीही नोटीस न देता किंवा चौकशी न करता कारवाई ईडी करत असेल तर केंद्र सरकारचा कारभार कशाप्रकारे सुरू आहे हे लक्षात येत आहे. मात्र यामुळे सरकारला कोणताही धोका नाही. सरकार पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला.

मुंबईत दोन ठिकाणी मनसेचे चालिसावाचन

मशिदीवरील भोंग्यांना उत्तर देण्यासाठी भोंगे लावून हनुमानचालिसा म्हणणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना मंगळवारी कुर्ला आणि घाटकोपरमध्ये रोखण्यात आले.

मनसेचा स्थानिक नेता महेंद्र भानुशाली याने आपल्या समर्थकांसह चांदिवलीच्या असल्फामध्ये झाडावर भोंगा लावून हनुमानचालिसा वाजवणे सुरू केले. पोलिसांना हा प्रकार समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत भानुशालीला ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले.

कुर्ला पश्चिमलाही मनसेने चालिसा वाचनाचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. शिवाजी मैदानाजवळ मनसैनिकांनी भोंगा लावून चालिसा सुरू करताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. मनसे पदाधिकारी व पोलिसांत वाद उद्भवला. पोलिसांनी ध्वनी प्रक्षेपक आणि भोंगा आदी साहित्य जप्त केले. त्यानंतरही मनसैनिकांनी उच्च सुरात चालिसा वाचन सुरूच ठेवले. त्यांच्या मदतीला वृत्तवाहिन्यांचे बूम होते.या चालिसा वाचनाचे मग काही वेळ थेट प्रक्षेपणच झाले. चालिसावरून वातावरण तणावपूर्ण होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी चालिसा म्हणणार्‍या मनसैनिकांना ताब्यात घेऊन कुर्ला पोलिस ठाण्यात आणले. त्यांना भादंवि 149 नुसार सक्त ताकीद देऊन सोडून देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT