पाटस : पुढारी वृत्तसेवा : पाटस (ता. दौंड) टोलनाका परिसरातील बारामती फाटा येथील पुणे-सोलापूर महामार्गावर लक्झरी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याने या अपघातात ५५ वर्षाच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे १५ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.
या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मारुती ग्यानोबा वडेर (वय ५५, रा. शिकारा जुना, ता. मुखेड, जि. नांदेड आहे. या घटनेची फिर्याद पांडुरंग ग्यानोबा वडेर (वय ४५) यांनी यवत पोलिसात दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी (दि.२१) रात्री साडेअकरा च्या सुमारास पाटस (ता. दौंड) टोलनाका जवळील बारामती फाटा येथे सोलापुर-पुणे महामार्गावर बस (एमएच २४ एबी ९८८९) चा गाडी चालक गजानन वैजनाथ जाधव (रा. केदारवडगांव, ता. नायगांव, जि. नांदेड) याने बस हयगईने, अविचाराने, नियमांकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात पुणे सोलापुर दिशेने चालविली. ही बस रस्त्याच्या दुभाजकमधून सोलापुर-पुणे या मार्गावर अचानक आली. त्यामूळे सोलापुर बाजुकडुन पुणे दिशेने जाणाऱ्या ट्रकला (एमएच ४२ टी ०२८९) ही लक्झरी जोरात धडकली.
या अघातात ट्रक चालक हवासिंग छित्तरसिंग व प्रवासी अर्चना गणेष देशमुख, श्रेया भगवान, श्री कंठवार, बालाजी पाटील, यश बालाजी पाटील, दिगंबर हनुमंत जाधव, फिरोज काझी, लक्ष्मीबाई गुणवंत सुद्रे, उशाबाई खांडेकर, विठठल गोरबा कोरंबे, माधव इंगले, माधव सुधाकर पांचाळ, भाउ मारोती वडेर व मुलगा विजय व्यकंट वडेर असे १५ प्रवासी जखमी झाले आहेत. यात मारुती ग्यानोबा वडेर यांचा मृत्यू झाल्याने या अपघातास जबाबदार धरून लक्झरी बस चालक गजानन वैजनाथ जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास पोलीस सहायक फौजदार बगाडे करीत आहे.