धुळे : पुढारी वृत्तसेवा; पुण्याकडून गोरखपुरला जाणारी आराम बस उलटून झालेल्या अपघातात वीस प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान आरामबस वर मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आलेल्या लगेज मुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे. (Accident)
धुळे तालुक्यातील नरडाणे गावाजवळ मुंबई आग्रा महामार्गावर हा अपघात झाला आहे. पुणे शहराकडून उत्तर प्रदेशातील गोरखपुरकडे जाणारी या क्रमांकाची आराम बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या कडेला उलटली. हा अपघात होताच शेतात काम करणारे शेतकरी तसेच शेतमजूर यांनी धावपळ करीत मदत कार्य सुरू केले. दरम्यान ही माहिती कळल्याने नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रुग्णवाहिकेमधून जखमी प्रवाशांना वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने हलवले. या अपघातात वीस प्रवासी जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान आराम बस मधील उर्वरित प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी पाठवण्यासाठी आरामबस मालकाच्या माध्यमातून पोलिसांनी अन्य वाहन उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. Accident
या वाहनांमधून या प्रवाशांना सुरक्षितरीत्या उत्तर प्रदेशात पाठवले जाणार आहे. या आराम बसच्या छतावर मोठ्या प्रमाणावर लगेज ठेवण्यात आल्याची बाब देखील निदर्शनास आली आहे. या लगेज मुळेच चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे. दरम्यान जखमींमध्ये रहिमा खांतून मोहम्मद सलीम, शंभू लाल बहादुर तारू, राजेश राम जीवन पासवान, गौतम शालिग्राम तिवारी, आदिश धर्मराज चौधरी, शिवकुमार गौतम प्रसाद, सुरज कुमार राकेश कुमार, इंद्रावती गौतम, शिवकुमार गौतम ,कन्नु दंते भारद्वाज,सेहदुर रेहमान आताऊल्लाह ,रामसागर विश्वकर्मा, शिवपूजन यादव ,रमेश पन्ना तेवर, वीरू लालानी तेवर, आलोक कुमार राधेश्याम, बिलाल शराफत अली, कृष्णकुमार राजकुमार ,नूरजहा मोहम्मद मुकीम , धर्मेंद्र पासवान यांचा समावेश आहे. या जखमींना उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.