पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच नागरिकत्व मिळवणारा भारत दुसरा मोठा देश ठरला आहे. अमेरिकेच्या संसदीय अहवालानुसार २०२२ मध्ये ६५ हजार ९६० भारतीय अधिकृतपणे अमेरिकेचे नागरिक बनले आहेत. यासह मेक्सिकोनंतर भारत आता अमेरिकेसाठी नवीन नागरिकांचा दुसरा सर्वात मोठा देश बनला आहे.
२०२२ पर्यंत ४ कोटी ६० लाख परदेशी जन्मलेले नागरिक अमेरिकेत राहत होते, जे अमेरिकेच्या ३३ कोटी ३० लाख लोकसंख्येच्या १४ टक्के आहे.
१५ एप्रिलच्या 'यूएस नॅचरलायझेशन पॉलिसी' अहवालानुसार 2022 च्या आर्थिक वर्षात ९६९,३८० लोक अमेरिकेचे नागरिक बनले. अमेरिकेतील नियमांनुसार नागरिकत्व मिळवण्याच्या बाबतीत मेक्सिको पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर भारत, फिलीपिन्स, क्युबा आणि डोमिनिकन रिपब्लिकमधील लोकांचा क्रमांक लागतो.
नवीन सीआरएस अहवालानुसार, २०२२ मध्ये मैक्सिकोच्या १ लाख २८ हजार ८७८ लोकांना अमेरिकेचे नागरिकत्व दिले आहे. भारताच्या ६५ हजार ९६०, फिलीपिन्स ५३ हजार ४१३, क्युबा ४६ हजार ९१३, डोमिनिकन रिपब्लिकमधील ३४ हजार ५२५, व्हिएतनाम ३३ हजार २४६, आणि चीनमधील २७ हजार ३८ नागरिकांना अमेरिकन नागरिकत्व दिले आहे. सीआरएस अहवालानुसार २०२३ पर्यंत अमेरिकेत परदेशी जन्मलेल्या नागरिकांपैकी २८ लाख ३१ हजार ३३० लोक भारतातील होते. मेक्सिको (१,०६,३८,४२९) नंतर ही दुसरी सर्वात मोठी संख्या आहे. याशिवाय २२ लाख २५ हजार ४४७ लोक चीनचे आहेत.
अमेरिकेत राहणाऱ्या एकूण भारतीय वंशाच्या लोकांपैकी ४२ टक्के लोक सध्या अमेरिकन नागरिकत्वासाठी अपात्र आहेत. २०२३ पर्यंत यूएसमध्ये ग्रीन कार्डवर असलेले अंदाजे २ लाख ९० हजार भारतीय वंशाचे परदेशी नागरिक आता नागरिकत्वासाठी पात्र आहेत. काही तज्ज्ञांनी अमेरिकन इमिग्रेशन विभागाच्या नागरिकत्वाच्या अर्जांच्या प्रक्रियेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.