Latest

‘…तर तुरुंगातूनच सरकार चालवता येईल’ : ‘आप’ आमदारांची सुनीता केजरीवालांकडे मागणी

backup backup

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची आम आदमी पक्षाच्या आमदारांनी भेट घेतली. यावेळी "अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ नये, सरकार तुरुंगातून चालवले जाऊ शकते" असे आम आदमी पक्षाच्या आमदारांनी सुनीता केजरीवाल यांना सांगितले. एकूण ५५ आमदार यावेळी उपस्थित होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात १५ एप्रिलपर्यंत तिहार तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर आपच्या आमदारांनी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली. "अरविंद केजरीवाल यांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ नये, सरकार तुरुंगातून चालवले जाऊ शकते" अशी गळ आपच्या आमदारांनी घातली.

आपचे आमदार सोमनाथ भारती म्हणाले की, "सर्व आमदारांनी त्यांचा संदेश सुनीता केजरीवाल यांना दिला आहे. अरविंद केजरीवाल यांनी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देऊ नये, असे आमदारांनी म्हटले आहे. दिल्लीतील लोक भाजपवर नाराज आहेत आणि भाजप दिल्लीतील सातही जागा गमावणार आहे.

काही दिवसानंतर इडी आम्हालाही अटक करेल- आतिशी

"दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर काही दिवसांनी इडी आम्हालाही अटक करेल," असा संशय दिल्लीतील मंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी यांनी व्यक्त केला. अरविंद केजरीवाल यांच्यासाठी न्यायालयीन कोठडीची मागणी करताना ईडीने आप नेते सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांच्या नावाचा न्यायालयात उल्लेख केल्यानंतर हे आरोप झाले आहेत.

दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी मंगळवारी आरोप केला की, मद्य धोरण प्रकरणी मार्चमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केल्यानंतर केंद्र सरकार आम आदमी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची योजना आखत आहे. आतिशीने दावा केला की तपास यंत्रणा लवकरच आतिशी, आप नेते सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चढ्ढा यांना अटक करतील. त्या पुढे म्हणाल्या की, भाजपला असे वाटते की अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि सत्येंद्र जैन तुरुंगात असूनही आम आदमी पार्टी अजूनही एकसंध आणि मजबूत आहे. त्यामुळे आता ते आम आदमी पक्षाच्या आणखी नेत्यांना तुरुंगात टाकु शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT