पणजी; पुढारी वृत्तसेवा : सिकेरी येथे चार वर्षांच्या चिन्मयचा खून केल्यानंतर मृतदेह बॅगेत कोंबून गोव्यातून बंगळूरला निघालेली सूचना सेठ टॅक्सीत सामान ठेवेपर्यंत खूप घाईत होती; पण टॅक्सीमध्ये बसल्यावर जवळपास 16 तास मात्र ती शांत आणि निर्विकार होती, असे टॅक्सीचालक रे जॉन याने सांगितले. सिकेरी येथील हॉटेलपासून चित्रदुर्गमधील पोलिस ठाण्यापर्यंतच्या प्रवासातील घटनाक्रम त्यांनी उलगडून दाखवला.
रविवारी मध्यरात्रीनंतर तो हॉटेलमध्ये तिला घेण्यासाठी दाखल झाला. त्याच्यासोबत देवराज शिंदे हा सहायक चालकही होता. जॉनने तिला 600 कि.मी.साठी 30 हजार रुपये भाडे सांगितले. ती कोणतीही घासाघीस न करता तेवढे भाडे द्यायला तयार झाली. जॉनला तिची बॅग आत ठेवताना नेहमीपेक्षा जड वाटली. त्यामुळे त्याने याबाबत विचारणा केली असता, तिने आत खूप कपडे ठेवलेत, त्यामुळे ती जड झाली असल्याचेे सांगितले.
मध्यरात्री साडेबाराला त्यांचा प्रवास सुरू झाला. चोर्ला घाटात अपघात झाल्याने रस्ता बंद होता. रस्ता खुला व्हायला किमान सात तास लागतील, असे कळल्याने त्याने तिला विमान प्रवासाचा पर्याय दिला. मात्र, तिने रस्त्यानेच जाण्याचा आग्रह धरला. ते मात्र जॉनला खटकले. सकाळी सहा वाजता त्यांचा पुन्हा प्रवास सुरू झाला. वाटेत त्यांनी नाश्ता केला.
काही तासांनी धारवाडच्या आसपास जॉनला कळंगुट पोलिस ठाण्यामधून फोन आला. पोलिसांनी सूचनासोबत मुलगा आहे काय? असे विचारताच त्याने नकारार्थी उत्तर दिले. त्यानंतर पोलिसांनी सूचनाला मुलाबाबत विचारल्यावर तिने मुलाला मडगावला मैत्रिणीकडे ठेवल्याचे सांगितले आणि मडगावचा पत्ताही दिला. पोलिसांच्या पडताळणीत तो खोटा निघाला. त्यांनतर पोलिसांनी जॉनला टॅक्सी थेट जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये नेण्यास सांगितले. यानंतर जॉनने टॅक्सी थेट आयमंगल-चित्रदुर्ग पोलिस ठाण्यामध्ये नेली.
पोलिस ठाण्याच्या आवारात पोहोचल्यावरही ती अतिशय शांत आणि निर्विकार होती. महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्या बॅगेत चिन्मयचा मृतदेह मिळाला; पण मुलाच्या मृत्यूचा अथवा तिने केलेल्या कृत्याचा कसलाही पश्चात्ताप तिच्या चेहर्यावर नव्हता.