न्यूयॉर्क : अमेरिकन अवकाश छायाचित्रकार अॅर्न्ड्यू मॅकर्थीने 'चांद्रयान-3' मोहिमेत भारताच्या विक्रम लँडरने ज्या ठिकाणी सॉफ्ट लँडिंग केले, त्याचे आपण अनोखे छायाचित्र टिपल्याचा दावा केला आणि ते छायाचित्र ट्विटही केले आहे. मॅकर्थीने यावेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील दुर्मीळ छायाचित्र येथे पोस्ट केले आहे. सोशल मीडियावर यूजर्सनी त्याच्या छायाचित्राला बरेच लाईक्स दिले आहेत.
मी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील भागाचे छायाचित्र आज रात्री टिपले. बुधवारी याच ठिकाणी विक्रम लँडरने सॉफ्ट लँडिंग केले. माझ्या दुर्बिणीतून जितके सखोल छायाचित्र टिपता येईल, ते मी टिपले आहे, असे मॅकर्थी आपल्या पोस्टमध्ये म्हणाला.
मॅकर्थीने अमेरिकन प्रमाणवेळेनुसार, शुक्रवारी रात्री उशिराने ही पोस्ट केली आणि त्यानंतर तासाभरातच पावणेदोन लाखापेक्षा अधिक जणांनी हे छायाचित्र पाहिले होते. यादरम्यान, इस्रोने देखील यापूर्वी 'चांद्रयान-3' मधील रोव्हर लँडरमधून खाली उतरत असतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता.