पुणे; पुढारी वृत्तसेवा : भारतीय महिलांमध्ये साहस, जिद्द आणि चिकाटी यावी हा संदेश देण्यासाठी आणि लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी नऊवारी साडी नेसून मराठमोळ्या रमिला लटपटे ह्या दुचाकीवरून जगभ्रमंती करणार आहेत. पुण्यातील चिंचवड येथील रहिवासी रमिला लटपटे मोटरसायकलवरून जगभ्रमंतीसाठी 9 मार्चला निघणार असून, सुमारे 365 दिवस पार करून 8 मार्च 2024 रोजी पुन्हा भारतात परतणार आहेत. जगभ्रमंतीमध्ये 12 खंड, 20 ते 30 देशांतून प्रवास करीत सुमारे एक लाख किलोमीटचा प्रवास पूर्ण करणार आहेत. बचत गटाच्या माध्यमातून बनविण्यात आलेले विविध पदार्थ आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करीत महाराष्ट्राची संस्कृती प्रत्येक देशापर्यंत पोहोचविण्याचा रमिला यांचा मानस आहे.
रमिला लटपटे यांच्या उपक्रमाची सुरुवात 9 मार्च रोजी सांयकाळी 4.30 वाजता गेट वे ऑफ इंडिया येथून होणार आहे. या वेळी फ्लॅग ऑफसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंतनू नायडू, प्रसाद नगरकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, सुरेश भोईर आदी उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी र्त्यंबकेश्वर, नाशिक येथे पहिला मुक्काम असणार आहे. अहिल्या फाऊंडेशन या
स्वयंसेवी संस्थेसाठी महिला व तरुणांच्या सक्षमीकरणाचे उपक्रम त्या राबवत आहेत. या प्रवासाचा शेवट 8 मार्च 2024 रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे होणार आहे.