राजगुरूनगर: पुढारी वृत्तसेवा : इयत्ता पाचवीतील मुलीला शाळेतून लाँजवर नेऊन अत्याचार करून पुन्हा शाळेत आणून सोडण्याची खळबळजनक घटना राजगुरूनगर(ता.खेड) जवळच्या राक्षेवाडीत घडली आहे. या प्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी ३५ वर्षाचा असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. वडिलांनी बोलावले आहे असे सांगून जिल्हा परिषदेच्या शाळेतून अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन अत्याचार करून पुन्हा शाळेत आणून सोडले. शाळेतून अल्पवयीन मुलीला घेउन जाऊन अत्याचार झाल्याने ग्रामस्थांनी शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पीडित मुलगी इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत आहे. तर आरोपी ३५ वर्षे वयाचा आहे. मुलीच्या आईने पोलिसांत शुक्रवारी (दि २३) तक्रार दिली असून केवळ कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी माहिती देणे टाळले आहे. या प्रकरणात शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.