Latest

कोरेगाव भीमा : अभिवादनासाठी आज लोटणार जनसागर; सकाळी आठ वाजल्यापासून विजयस्तंभ सर्वांसाठी खुला

अमृता चौगुले

पुणे / कोरेगाव भीमा : पुढारी वृत्तसेवा : पेरणे (ता. हवेली) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून अभिवादनासाठी विजयस्तंभ खुला केला जाणार आहे. समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी शनिवारी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. या वेळी बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

रविवारी पहाटे धम्मयाचना, सकाळी भारतीय बौद्ध महासभा सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात येईल. त्यानंतर मान्यवर अभिवादन करतील. त्यानंतर समता सैनिक दल, महार बटालियन सेवानिवृत्त सैनिकांकडून सलामी व मानवंदना देण्यात येईल. सकाळी 8 वाजल्यापासून सर्व अनुयायांसाठी अभिवादन स्थळ खुले असणार आहे.

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन करण्याची जबाबदारी राज्य शासनाने समाज कल्याण विभागाकडे सोपवली आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणाची तयारी पूर्ण झाली आहे. गृह विभागाने विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. डॉ. नारनवरे यांनी येणार्‍या सर्व अनुयायांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दिवसभर थेट प्रसारण

अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महसूल विभाग, पोलिस विभाग, जिल्हा परिषद विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पी. एम. पी.एल., राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, समाज कल्याण आयुक्तालय पुणे, महावितरण कंपनी, आरोग्य विभाग यांच्यासह विविध विभागांकडून नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सकाळी 6 वाजल्यापासून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दिवसभर थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष
अभिवादन करण्यासाठी येणार्‍या महिलांची संख्या विचारात घेता लहान बाळांना स्तनपानासाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर हिरकणी कक्षाचे उद्घाटन डॉ. प्रशांत नारनवरे आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये, पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, समाज कल्याण सहायक आयुक्त संगीता डावखर आदी या वेळी उपस्थित होते.

आरोग्य सेवा : विजयस्तंभ ते पार्किंगचे ठिकाण हे अंतर जास्त असल्याने कोणत्याही अनुयायाला काही त्रास झाल्यास किंवा दुखापत झाल्यास, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 'आरोग्य दूत' ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली आहे. येणार्‍या अनुयायांची गर्दी विचारात घेता दुचाकीवरील आरोग्य दूत तत्काळ आरोग्य सेवा देतील. आरोग्य विभागाची ही संकल्पना नव्याने येथे अमलात येत आहे. तसेच, आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी कक्षदेखील उभारण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT