पुढारी ऑनलाईन: घरातून बाहेर पडल्यानंतर अनेक भारतीयांना आपल्या परिसरात शौचालयाच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अस्वच्छ शौचालये, खराब पायाभूत सुविधा, असुरक्षितता आणि सुविधांची कमतरता यासारख्या समस्या निसर्गाने हाक दिल्यावर लोकांना भेडसावतात. 'टॉयलेटसेवा' हे एक मोबाईल-आधारित ऍप्लिकेशन आहे, जे लोकांना दररोज भेडसावणाऱ्या समस्या ओळखते आणि स्वच्छ, वापरण्यायोग्य शौचालय शोधण्यात मदत करते तेही एका क्लिकवर.
आपल्या जसं एखादं कॅफे, हॉटेल, दुकान, पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल एका क्लिक वर मिळतं. अगदी तसंच तुम्हाला सुलभ शौचालय किंवा स्वच्छतागृह ऑनलाईन शोधता येणार आहे. 'टॉयलेटसेवा' हे ॲप तुम्हाला तुमच्या परिसरात किती स्वच्छतागृह आहेत आणि ते स्वच्छ आहे कि नाही हेही दाखवेल.
पुण्यातील अमोल भिंगे यांनी "टॉयलेट सेवा" नावाचे ॲप बनवले आहे. भिंगे हे पुण्याचे असून ते सध्या अमेरिकेत एका खाजगी संस्थेत कार्यरत आहेत. इंजिनीयर असलेली अमोल भिंगे यांना पुण्यात एकदा स्वच्छतागृहाबाबत वेगळा अनुभव आला आणि त्यांनी थेट त्या संदर्भात काही तरी करण्याचे ठरवले.
"जवळपास सहा वर्षांपूर्वी शहरातील एका ज्वेलरी स्टोअरच्या वॉशरूममध्ये गेलो होतो. मात्र, वॉशरूमची अवस्था इतकी नाजूक आणि खराब होती की, मला ती स्टोअर मॅनेजरच्या निदर्शनास आणून द्यावी लागली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांनी ही किरकोळ समस्या वाटली. देवप्रयागच्या माझ्या भेटीदरम्यान मला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. तिथे मला स्थानिक रहिवाशांनी मदत केली. परंतु स्वच्छ आणि चांगल्या शौचालयात प्रवेश न मिळणे हे फार निराशाजनक आहे. या घटनांनी माझ्यात एक बीज रोवले आणि मला त्याबद्दल काहीतरी करायला भाग पाडले," असे 'टॉयलेट सेवा'चे संस्थापक अमोल भिंगे म्हणाले.
भिंगे म्हणाले की, लोकांना स्वच्छतेच्या चांगल्या पद्धतींच्या गरजेबद्दल जागरूक करण्यासाठी ॲप विकसित करणे आणि त्याच वेळी, शौचालय पुरवठादार आणि शौचालय वापरकर्ते यांच्यातील दरी कमी करणे हा या मागचा उद्देश आहे.
टॉयलेटसेवा, ही महामारीच्या काळात आकार घेऊ लागली, डिसेंबर 2021 मध्ये काही चाचण्या चालवल्या गेल्या. हे ॲप शौचालय स्वच्छ आहे की नाही हे तपासण्याची सुविधा देते. त्याच बरोबर शौचालयात लॉक/लॅचेस, सॅनिटरी नॅपकिन्स, सीट कव्हर, डायपर बदलणारे टेबल यांसारख्या सुविधा आहेत की नाही याचा रिव्हियू देण्याची सुविधाही देते.
आता नेमकं हे ॲप आपण वापरायचं कसं हा प्रश्न पडला असेल. जर तुमच्याकडे अँड्रॉइड किंवा आयओएस मोबाईल असतील तर हे ॲप वापरण्यास कोणतीही अडचण येणार नाही. ॲप उघडल्यानंतर तुम्ही तुमचे लोकेशन टाका. मग तुम्हाला त्या भागातील सार्वजनिक, हॉटेल, पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल, तीर्थ क्षेत्र, शिक्षण संस्था या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांची यादी दिसेल. सध्या या ॲपमध्ये भारतातील दीड लाखाच्या आसपास स्वच्छतागृह यांची अपडेटेड यादी उपलब्ध आहे. फक्त पुण्याबाबत बोलायचं झालं तर शहरातील 2600 स्वच्छतागृह या ॲपमध्ये तुम्हाला सापडतील.