रायगड; पुढारी वृत्तसेवा : पनवेल शहरात पैशाच्या कारणावरुन मित्राने मित्राचे शिर धडावेगळे करून त्याचा खून (Murder) केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पनवेल शहर पोलिसांंनी याप्रकरणी आरोपीला अटक करून गजाआड केले आहे. केवळ पैश्याच्या क्षुल्लक कारणावरून हा खून करण्यात आला.
पनवेल येथून महंमद अस्लम हाश्मद (वय ४२ वर्षे, रा. जुने कोर्टजवळ, पनवेल) नावाचा व्यक्ती बेपत्ता असल्याची फिर्याद मुक्कर्रम कसार (रा. नेरुळ) यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस पथकाने बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मोबाईलचे सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज या तांत्रिक बाबींचा तपास केला. तपासादरम्यान बेपत्ता व्यक्तीचा मित्र शफिक हैदर याच्या सोबत शेवटचे पाहिले असल्याची माहिती समोर आली.
या माहितीवरुन शफिक हैदर (रा. वडघर, पनवेल, मूळ रा सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) याचा तपास केला असता तो वडघर, पनवेल येथुन अचानक त्याचा मोबाईल बंद करुन मुळ गावी उत्तरप्रदेश येथे जात असल्याची माहिती समोर आली. दरम्यान पोलीस पथकाने उत्तरप्रदेश जाणाऱ्या रेल्वेत जाऊन हैदरजवळ बेपत्ता अस्लम याच्याबाबत विचारपूस केली. यावेळी बेपत्ता व्यक्तीबाबत काहीतरी बरेवाईट झाले असल्याचा संशय बळावला.
शफिक अली हैदरने पोलीस पथकाला त्या दोघांमध्ये वाद झाला असल्याचे सांगितले. पैशांच्या कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन दि. 28 जून रोजी पहाटे 02.00 चे 03.00 वाजताच्या दरम्यान अस्लम याच्यावर हल्ला केल्याचे हैदरने सांगितले. दिप एन्टरप्राईजेस बिल्डींग, पुष्पक नोड (वडघर ता. पनवेल) या ठिकाणी अस्लमच्या मानेवर मासे कापण्याच्या सुरीने वार करुन खून केल्याचे हैदरने सांगितले. तसेच खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे धड एका नायलॉनच्या पोत्यात चिंचपाडा, कळंबोली सर्विस रोडच्या डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला टाकून दिले आणि मुंडके करंजाडे येथील नाल्यात टाकल्याची माहिती हैदरने पोलिसांना दिली.
शफिक अली हैदरने (वय 43 वर्षे) दिलेल्या कबुलीनंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी हैदरने दिलेल्या माहितीनुसार, अस्लमच्या मृतदेहाचा तपास केला. मृतदेह मिळाल्यानंतर शवविच्छेदनाकरीता उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे पाठवण्यात आले.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग राजपुत व पोलीस हवलदार हनुमंत अहिरे, सहा. पोलीस उपनिरिक्षक योगेश मैड, चेतन पाटील, मनोज पाटील, पोलीस धर्मेश म्हात्रे या तपास पथकाने या घटनेचा तपास केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे करीत आहेत.