पुणे : पुढारी वृत्तसेवा : घटस्फोटास आईच जबाबदार असल्याच्या संशयातून मुलाने आईची गळा चिरून निर्घृण हत्या केली. नंतर तो घराला कुलूप लावून फरार झाला. हा प्रकार खडकी येथील रेंजहिल्स परिसरात घडला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी आईचा खून करणार्या नराधम मुलाला शिर्डी येथून बेड्या ठोकल्या आहेत. गुंफाबाई शंकर पवार (वय 55, रा. श्रीरामपूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी खून करणारा मुलगा ज्ञानेश्वर शंकर पवार (वय 29, रा. रेंजहिल्स, खडकी कॅन्टोन्मेंट फॅक्टरी) याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर रेंजहिल्स येथील खडकी कॅन्टोन्मेंट फॅक्टरीमध्ये नोकरीला आहे. त्याचा चार ते पाच वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. तो त्याची आई श्रीरामपूर येथील मुठे वडगाव येथे तिच्या कुटुंबासोबत राहत होता.
मुलगा पुण्यात नोकरीस असल्याने ती वेळ काढून त्याला भेटण्यासाठी येत असे. मुलाच्या बोलाविण्यावरून ती त्याच्या घरी आली होती. त्याच्याकडे आल्यानंतर त्याच्या घटस्फोटास आईच जबाबदार असल्याचा त्याचा संशय होता. याच संशयातून त्याने आईचा धारदार हत्याराने गळा चिरून खून केला. रक्ताच्या थारोळ्यात आईचा मृतदेह टाकून तो आपल्या घराला बाहेरून कुलूप लावून फरार झाला.
गुंफाबाईच्या घरच्यांनी तिला तसेच ज्ञानेश्वरला फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा फोन लागत नसल्याने महिलेच्या नातेवाइकांनी घरी जाऊन पाहिले असता ज्ञानेश्वरच्या घराला कुलूप लावले होते. मात्र, गुंफाबाईच्या चपला दारातच होत्या. त्यामुळे नातेवाइकांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांना रक्त पडलेले दिसले.
त्यानुसार पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. या वेळी दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला असता गुंफाबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर लागलीच पोलिसांची पथके आरोपीच्या शोधासाठी मागावर लावण्यात आली. ज्ञानेश्वरचा फोन बंद येत असल्याने त्यानेच हा खून केल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी ज्ञानेश्वरचा शोध सुरू केला. ज्ञानेश्वर शिर्डी येथील पुणतांबा येथे असल्याची माहिती खडकी पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली खून करणार्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
आईमुळेच आपला घटस्फोट झाला, या संशयातून मुलाने आपल्या आईचा खून केल्याचा हा प्रकार प्राथमिक तपासातून निष्पन्न झाला आहे. आईचा खून करून बाहेरून कुलूप लावून फरार झालेल्या मुलास पळून जात असताना पथकाने शिर्डी येथील पुणतांबा येथून ताब्यात घेतले आहे.
– गिरीशकुमार दिघावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खडकी पोलिस ठाणे