मुंबई : पुढारी वृत्तसेवा : बोरिवली पश्चिमेकडील साईबाबा नगर येथील ४ मजली गीतांजली इमारत दुपारी १२ वाजेच्या दरम्यान कोसळली. घटनास्थळी ४ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस पोहोचले. धोकादायक झालेली इमारतीला पालिका आर. मध्ये विभागाने नोटीस दिली होती. परंतु रहिवासी कोर्टात गेले होते. मात्र आज सकाळी गितांजली इमारतीमधील रहिवाशांनी स्व:त इमारत रिकामी केली होती. यानंतर दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान ही इमारत अचानकपणे कोसळली. त्यावेळी या इमारतीमध्ये कुणीही रहिवासी नव्हते. यामुळे आज दहीहंडीच्या सणाच्यादिवशी मुंबईत मोठी जीवितहानी टळली, अशी माहिती पालिका आर. मध्य विभागातील सहाय्यक आयुक्त निवृत्ती गोंधळी यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.
यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यात कोणीही अडकलेले नाही, असे मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. बोरिवली पश्चिम येथील साईबाबा नगर येथील गितांजली ही निवासी इमारत कोसळली. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच १२ ते १५ गाड्या दुर्घटनास्थळी पोहोचल्या. ढिगाऱ्याखाली काहीही नसल्याचे मुंबई पालिका प्रशासनाने सांगितले असून हा ढिगारा लवकरच बाजुला केला जाईल, अशी माहिती देण्यात आली.
घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. सणाच्यादिवशी ही इमारत कोसळल्याने भिती व्यक्त करण्यात आली होती.