file photo 
Latest

चंदनापुरीच्या जुन्याघाटात चार लुटारुंनी पुण्याच्या व्यावसायिकाला लुटले

अमृता चौगुले

संगमनेर पुढारी वृत्तसेवा :  पुण्यातील सुवर्णाअलंकाराच्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे संगमनेरातील सुवर्णकारांना निमंत्रण देण्यासाठी पुण्याहून संगमनेरला येणार्‍या एका तरुण व्यावसायिकाची दिशाभूल करुन त्याला चंदनापुरीच्या जुन्या घाटाने पाठविले. या घाटात पुढे येताच चौघांनी त्यास चाकूचा धाक दाखवून त्यास लुटत त्याच्याकडील सोन्याचांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असा साडेअठरा हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे फरार झाले . याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, पुणे येथील कासारवाडीत (भोसरी) राहणारा प्रिंस ललीत शर्मा हा बावीस वर्षीय तरुण व्यावसायिक पुण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या सुवर्ण अलंकारांच्या प्रदर्शनाचे निमंत्रण संगमनेर शहरातील सुवर्णकारांना देण्यासाठी आपल्या दुचाकीवरुन पुण्याहून संगमनेरच्या दिशेने येत होता. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तो चंदनापुरी घाटातील गुंजाळ यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाजवळ पोहोचला असता रस्त्यावर उभ्या असलेल्या एका अनोळखी इसमाने त्याला थांबवत पुढे वाहतुकीची मोठी कोंडी झाली  असून  तुम्ही जुन्या मार्गाने जा असे सांगितले

अनोळखी इसमावरती विश्वास ठेवून त्या तरुण व्यावसायिकाने आपली दुचाकी जुन्या घाटाने घेतली अन तो गणपती मंदिरा जवळ आल्यावर आधीपासूनच थांबलेल्या चौघांनी त्याला थांबवले.  त्यातील एकाने शर्मा यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील चांदीची साखळी, हातातील चांदीचे कडे, रेडमी कंपनीचा मोबाईल आणि पाकीटातील दीड हजार रुपयांची रोकड असा एकूण 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला आणि ते चौघेही अज्ञात चोरटे पल्सर व पांढर्‍या रंगाच्या एक्टिव्हा दुचाकीवरुन पसार झाले.

या घडल्या प्रकाराची माहिती प्रिन्स शर्माने  संगमनेर तालुका पोलिसांना कळविली. माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे पोलीस अधीक्षक राहुल मदने, प्रभारी निरीक्षक सुनील पाटील व पोलीस उपनिरीक्षक ईस्माइल शेख यांनी तत्काळ चंदनापुरी घाटात धाव घेत आसपासचा परिसर पिंजून काढला, मात्र त्यांना चोरट्यांचा मागमूस काढता आला नाही. याबाबत  प्रिन्स शर्मा यांनी संगमनेर तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चार चोरट्यांच्या विरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल केला.  याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ईस्माइल शेख हे करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT