ज्ञानेश्वर बिजले
पुणे : भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या कसबा पेठ मतदारसंघात महाविकास आघाडीने उभारलेल्या आव्हानांचा सामना करताना भाजपच्या नेत्यांची धावपळ उडाली आहे. दिवसेंदिवस चुरस वाढत चाललेल्या या पोटनिवडणुकीत आगामी आठवड्यातील प्रचाराच्या रणधुमाळीत दोन्ही बाजूंचे रथी-महारथी उतरणार आहेत.
भाजपने पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने आणि मविआतर्फे काँग्रेसने माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. या पोटनिवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही प्रमुख पक्षांकडून मतदारसंघातील ब्राह्मण आणि मराठा या अधिक लोकसंख्येच्या समाजाचे प्रतिनिधी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले नाहीत. बारा बलुतेदारांची वस्ती असलेल्या या मतदारसंघात ओबीसी मतदारही मोठ्या संख्येने आहेत. ओबीसी समाजाच्या या दोन्ही कार्यकर्त्यांत अटीतटीची लढत होत असून, दोन्ही बाजूंनी पक्षसंघटना खंबीरपणे उमेदवारांच्या पाठीशी उभ्या ठाकल्या आहेत.
भाजपच्या बाजूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज मंत्री, नेते प्रचाराला लागले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाशिवरात्रीला मतदारसंघातील ओंकारेश्वर मंदिराला भेट देणार आहेत. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनाही प्रचारात उतरविण्यासाठी भाजप नेते प्रयत्नशील आहेत. मविआच्या बाजूने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह तिन्ही पक्षांचे अनेक नेते प्रचारात सहभागी होत आहेत.
असा आहे मतदारसंघ
कसबा पेठ मतदारसंघ म्हणजे जुने पुणे. सर्व पेठांचा समावेश यात झाला आहे. ब्राह्मण व मराठा समाजाबरोबर बारा बलुतेदारांची पूर्वापार वस्ती शहराच्या पूर्वेकडील पेठांमध्ये आहे. काही भागात मुस्लिम, दलित समाजाची वस्ती आहे, तर बाजारपेठेमुळे व्यापारी वर्गही येथील रहिवासी आहे.
मतदारसंघातील पश्चिमेकडील पेठांमध्ये भाजपला मोठे मताधिक्य मिळते. शहराच्या पूर्व भागातील पेठांमध्ये काही ठिकाणी विरोधी पक्षाचे प्राबल्य आहे. गेल्या निवडणुकीत पूर्व भागात भाजपने विरोधी पक्षांना रोखले, तर पश्चिम भागातील मताधिक्याच्या जोरावर निवडणूक जिंकली. धंगेकर गेली वीस वर्षे पूर्व भागातून निवडून येतात.
तिन्ही पक्षांची मते एकत्रित येतील, असा मविआच्या नेत्यांचा दावा आहे. भाजपने ब्राह्मण उमेदवार नाकारल्याची चर्चा सुरू झाल्याने, भाजपला थोडे बॅकफूटला जावे लागले. त्याची उत्तरे देण्यातच भाजपच्या नेत्यांचा वेळ जाऊ लागला. फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर, आजारी असलेले बापट यांनी एक बैठक घेतली. या अडचणींवर मात करण्यासाठी भाजपने सर्व पक्षसंघटना प्रचारात उतरविली.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष प्रथमच एकत्रितरीत्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. धंगेकर हे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या भागात लोकप्रिय आहेत. हा मतदारसंघ त्यांनी जिंकल्यास भाजपला मोठा धक्का बसेल. महापालिकेच्या आगामी निवडणुकीवरही त्याचा परिणाम होईल. त्याचबरोबर बालेकिल्ला गमावल्याचा फटका भाजपच्या राज्यातील प्रतिमेलाही बसेल. त्यामुळे मतदारसंघ राखण्यासाठी भाजपची सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे.
गेल्या तीन निवडणुकांतील चित्र
मतदारसंघाची 2009 मध्ये फेररचना झाली, तेव्हा आकारमानाने लहान असलेल्या कसबा पेठ मतदारसंघात लगतच्या तीन मतदारसंघांचे भाग समाविष्ट झाले. त्या वेळी निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट विजयी झाले होते. त्यांना 35 टक्के मते, तर मनसेचे रवींद्र धंगेकर आणि काँग्रेसचे रोहित टिळक यांना प्रत्येकी 30 टक्के मते मिळाली. त्यानंतर मोदी लाटेत झालेल्या दोन्ही निवडणुका भाजपने जिंकल्या. विरोधकांतील मत विभागणीमुळे त्यांचे मताधिक्य वाढले.
कसबा पेठ मतदारसंघ
एकूण मतदारसंख्या
2,75,428
मतदारसंघाचे महापालिकेतील बलाबल
नगरसेवकांची संख्या ः18
भाजप ः 13
काँग्रेस ः 2
राष्ट्रवादी ः 2
शिवसेना ः 1
निवडणूक निकाल
सन 2019
मुक्ता टिळक
(भाजप) 75,492
अरविंद शिंदे
(काँग्रेस) 47,296
विशाल धनवडे
(अपक्ष) 13,989
अजय शिंदे (मनसे) 8,284
सन 2014
गिरीश बापट
(भाजप) 73,594
रोहित टिळक
(काँग्रेस) 31,322
रवींद्र धंगेकर
(मनसे) 25,998
दीपक मानकर
(राष्ट्रवादी) 15,865
सूर्यकांत आंदेकर
(अपक्ष) 10,001
प्रशांत बधे
(शिवसेना) 9,203