Latest

86 व्या वर्षी चक्क बॉडीबिल्डिंग

Arun Patil

टोकियो : जपानी लोकांना दीर्घायुष्याचे वरदानच मिळालेले असावे अशी स्थिती आहे. तिथे शंभरी ओलांडलेले लोक मोठ्या संख्येने आढळतात. मात्र, उतारवयातही कुणी बॉडीबिल्डिंग करील याची आपण कल्पनाही करणार नाही. हिरोशिमा शहरातील तोशिसुके कानाजावा नावाचे 86 वर्षांचे एक आजोबा चक्क बॉडीबिल्डर आहेत. त्यांची पिळदार शरीरयष्टी तरुणांनाही लाजवेल अशी आहे.

वयाची 80 वर्षे ओलांडल्यावर अनेक लोकांना चालणे-फिरणेही कठीण होत असते. मात्र, 86 वर्षांचे वय असूनही तोशिसुके यांना पाठदुखी, गुडघेदुखी अशा कोणत्याही समस्या नाहीत. तसेच जीममध्ये जाऊन नियमित व्यायाम करीत असतानाही त्यांना कसला त्रास होत नाही. ते आजही अनेक तास व्यायाम करतात. आपल्या तरुणपणी ते अनेक वेळा चॅम्पियन बॉडीबिल्डर ठरले होते.

वयाच्या 34 व्या वर्षी त्यांनी शरीरसौष्ठव स्पर्धांमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांनी व्यायाम बंद केला होता आणि वाटेल ते खाणे-पिणे सुरू केले होते. धूम्रपान व मद्यपानाचे व्यसनही त्यांना जडले होते. त्याचा अर्थातच त्यांच्या शरीरावर परिणाम झाला. त्यावेळी आरशात पाहत असताना एकदा त्यांना जाणवले की हे बॉडीबिल्डिंग चॅम्पियनचे शरीर आहे का? हा विचार येताच त्यांनी पुन्हा एकदा म्हणजे वयाच्या 50 व्या वर्षांनंतर व्यायाम करणे सुरू केले व खाण्या-पिण्याचे नियमही पाळू लागले.

आता याच वर्षी 9 ऑक्टोबरला जपान चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होणारे ते सर्वाधिक वयाचे स्पर्धक ठरले होते. त्यांनी या स्पर्धेत अन्य तरुण स्पर्धकांना टक्कर देणार्‍या शानदार पोज दिल्या. मात्र, ते अंतिम फेरीतील बारा स्पर्धकांमध्ये समाविष्ट होऊ शकले नाहीत. 'मी केवळ स्पर्धेत सहभागी होता आले यावरच समाधानी आहे. उतारवयातही माणूस आव्हाने स्वीकारू शकतो हेच मला दाखवायचे होते', असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT