नगर : पुढारी वृत्तसेवा : भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचे स्मारक स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू झाले, तरी उपेक्षित राहिले याचे दुःखद आहे. परंतु, निधी नाही म्हणून रक्त सांडू नका. चौथे शिवाजी महाराजांच्या आठवणी तेवत ठेवण्यासाठी त्यांच्या नावे सुरू असलेल्या विद्यार्थी साह्यता केंद्राचे काम अभिमानास्पद आहे. याकामी 80 लाखांचा निधी त्वरित उपलब्ध करू देऊ, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकार्यांनी चौथे शिवाजी महाराजांच्या स्मारकाला निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिले होते.
त्या पार्श्वभूमीवर स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकार्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात भेट घेऊन निधीची मागणी केली. यावेळी आमदार संग्राम जगताप, संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल, बांधकाम व्यावसायिक धिरज कुमटकर, विनीत गाडे, मयुर ढगे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी विद्यार्थी संघटनेने गेल्या पंधरा वर्षापासून छत्रपती चौथी शिवाजी महाराज स्मारकासाठी केलेल्या कामाची माहिती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थी संघटनेच्या निवेदनाची तात्काळ दखल घेत भरीव निधी देण्याची हमी दिली. ते म्हणाले, यापुढे चौथे शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ सर्वांना प्रेरणास्थळ म्हणून परिचित होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू. शासन स्तरावरून छत्रपती चौथी शिवाजी महाराज स्मारकासाठी यापुढे निधी कमी पडणार नाही याची दक्षता घेऊ. दरम्यान, स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी उपमुख्यमंत्र्यांना अहमदनगरच्या दौर्यावर आल्यावर स्मारकास भेट देण्याची विनंती केली. यावरही पवारांनी होकार भरला.
हेही वाचा :