सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरालगत पोलिस पत्नीने सुपारी देऊन पतीचा खून केलेल्या प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. 8 महिन्यानंतर एका संशयिताला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अजून एकजण पसारच आहे. अमित ऊर्फ हिरो शिवाजी जाधव (वय 25, रा. रविवार पेठ, सातारा) असे संशयिताचे नाव आहे.
दि. 24 जानेवारी रोजी मध्यरात्री अमित आबासाहेब भोसले (रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांचा अज्ञातांनी दुचाकीवर येऊन गोळीबार करुन धारदार शस्त्राने गळा चिरत खून केला. घटनेवेळी अमित भोसले हा एका महिलेसोबत कारमध्ये जेवण करत बसला होता. हात धुण्यासाठी कारमधून उतरल्यानंतर टपून बसलेल्या टोळक्याने अमित यांचा खून केला. या घटनेची सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास सुरु झाल्यानंतर एक-एक धक्कादायक माहिती समोर येत गेली. त्यानुसार या गुन्ह्यात आतापर्यंत पाच जणांना अटक झाली आहे. महिला पोलिसाने पतीचा सुपारी देऊन खून केल्याने पोलिस दलासह राज्यात खळबळ उडाली होती.
खुनाच्या या घटनेनंतर आणखी दोघेजण पसार झाले होते. पोलिसांनी जंग-जंग पछाडल्यानंतरही संशयित हातावर तुरी देत होते. दि. 31 ऑगस्ट रोजी या खून प्रकरणात एका संशयिताची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित अमित जाधव याला दहिवडी येथून ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.