सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : विविध गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेले 637 विदेशी कैदी राज्यातील तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत आहेत. यामध्ये सर्वाधिक 200 कैदी बांगलादेशमधील आहेत. दोषी ठरविण्यात आलेले 32 कैदी असून दोषी कैद्यांमध्ये 29 पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. 605 कच्चे कैदी असून त्यांच्यावर खटले सुरू आहेत.कच्च्या कैद्यांमध्ये 494 पुरुष, तर 11 महिला कैदी आहेत. विदेशी कैद्यांना तुरुंग प्रशासनाने व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध करुन दिली असून त्यातून पाकिस्तान आणि बांगलादेशातील कैदी व दहशतवादी कृत्यांसाठी तुरुंगात असलेल्यांना वगळले आहे.
बनावट पासपोर्ट, घुसखोर नागरिक, अंमली पदार्थ तस्करी तसेच इतर अनेक प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांना राज्यातील वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. विदेशी कैद्यांचे नातेवाईक अथवा वकील प्रत्यक्ष भेटून मुलाखत घेण्यासाठी येऊ शकत नसल्याने या कैद्यांना कायदेशीर मदत मिळण्यास व तुरुंगातून सुटका होण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे या कैद्यांमध्ये नैराश्य वाढू लागले असून त्यातून काहीही गैरप्रकार घडण्याचा धोका असतो. मानवतेच्या दृष्टिकोनातून ही सुविधा पुरवून मानवी हक्कांचे सरंक्षण करणे गरजेचे असल्याने कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी परदेशी कैद्यांना व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्हिडीओ कॉल सुविधा यशस्वी करण्याची जबाबदारी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
तुरुंगामध्ये असलेल्या कैद्यांना दूरध्वनी सुविधा तसेच भारतीय कैद्यांना व्हिडीओ कॉलची सुविधा याआधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. यामध्ये सुधारणा करुन तुरुंग प्रशासनाने यामध्ये विदेशी कैद्यांचा समावेश केला आहे. दोन आठवड्यातून एकदा 15 मिनिटे व्हिडीओ कॉलद्वारे कैद्यांना त्यांच्या विदेशातील नातेवाईकांशी बोलता येणार आहे.
बांगलादेश ः 200
नायजेरिया ः 197
मॉरिशस ः 103,
युगांडा ः 14
पाकिस्तान ः 12
ब्राझील ः 12
इतर देशांतील ः 637
दोषी ठरविण्यात
आलेले कैदी ः 32