वाडा(ता.खेड) ; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम दुर्गम भागातील भिवेगांव येथील वयोवृद्ध शेतकरी लक्ष्मण रामभाऊ वनघरे (वय वर्ष 60) हे गोठ्यामध्ये गुरे बांधण्यासाठी गेले असता त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला, असून त्यात ते मयत झाले आहेत. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, भिवेगांव येथे 19 जानेवारीला सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान लक्ष्मण रामभाऊ वनघरे हे आपली जनावरे गोठ्यामध्ये बांधण्यासाठी गेले असताना घरी परताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला असून त्यात वृद्ध लक्ष्मण वनघरे यांचा जागीच मृत्यू झाला.
बिबट्याने त्यांच्या गळ्याच्या, शरीराचा पुढचा भाग तसेच शरीराचा काही भाग खाल्ला व मोठ्या जखमाही झाल्या आहेत. जनावरे बांधण्यासाठी गेलेली व्यक्ती घरी न परतल्याने त्यांची आसपास शोधाशोध घेत असताना गोठ्याच्या जवळच असलेल्या बिबट्याने शोधनाऱ्यावरही चाल करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरडाओरडा केल्याने बिबट्या जंगलात पसार झाला.
या बाबतची माहिती मिळताच वनविभागाचे टोकावडे वनविभागाचे वन परिमंडल अधिकारी चेतन नलावडे, वनरक्षक ए.आर. गुट्टे, संदिप अरूण यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन लक्ष्मण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजगुरूनगर- चांडोली ग्रामीण रूग्णालयात आणला. पुढील तपास वनविभागाच्या वतीने सुरू आहे. नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे, नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी उपसभापती व संचालक विठ्ठल वलघरे यांचे लक्ष्मण हे चुलत बंधू आहेत.